

ठाणे : ठाण्याच्या मानपाडा परिसरात सीएनजी पंप पुढे असलेल्या नाल्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या ठिकाणी नाल्यात बुधवारी (दि.1) सांयकाळी नाल्यात गाईची पाच वासरे ही मृतावस्थेत आढळली. या घटनेमुळे एकच खळबळ उडालेली आहे. वासरांचे मृतदेह हे बाहेर काढून पशुवैद्यकीय विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या स्वाधीन करण्यात आलेली आहेत.
बुधवारी (दि.1) सांयकाळी मानपाडा, येथे या नाल्यामध्ये मृतावस्थेत पाच गाईची वासरे आढळली. याबाबतची माहिती त्वरित ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळताच घटनेची माहिती चितळसर पोलीसाना ही मिळाली. दरम्यान घटनास्थळी चितळसर पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी जेसीबी मशिनसह, अग्निशमन दलाचे जवान वाहनासह, ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदरचे वासरांचे मृतदेह हे नाल्यातून जेसीबीच्या सहाय्याने बाहेर काढून पशुवैद्यकीय विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्यांच्या ताब्यात देण्यात आले असून उर्वरित कार्यवाही चितळसर पोलीस व पशुवैद्यकीय विभागाकडून करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. दरम्यान ही वासरे या नाल्यात कशी याबाबत ठाण्यात एकच चर्चा रंगलेली आहे.