वाडा : मच्छिंद्र आगिवले
दिवाळी गणपती, वाढदिवस ,लग्नसमारंभ, एखाद्या नेत्याचे आगमन, सण उत्सव अश्या कुठल्याही शुभ कार्यात हल्ली फटाक्यांची आतिषबाजी केल्याशिवाय शोभा नाही. प्रसिद्ध वाड्यातील फटाका व्यवसाय यामुळेच हल्ली नावारूपाला आला असून कोकणासह नाशिक परिसरातूनही मोठ्या संख्येने व्यापारी तसेच ग्राहक फटाके खरेदीसाठी सध्या झुंबड करीत आहेत.
दिवाळी अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपली असताना इथूनच फटाके खरेदीसाठी ग्राहकांची पावले वाड्याच्या दिशेने वळू लागली आहेत.आंध्रप्रदेशातील शिवकाशी तर महाराष्ट्रातील तारखेडा, उस्मानाबाद व जळगाव येथून मोठ्या प्रमाणात फटाके वाडा येथे विक्रीसाठी येतात. थेट कारखान्यातून हे फटाके येत असल्याने ते स्वस्त व दर्जेदार असतात असा ग्राहकांचा अनुभव आहे. दिवाळीच्या जवळपास महिनाभर आधीपासूनच नाशिक, रायगड, नवीमुंबई ,मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच नजीकच्या परराज्यातून ही मोठ्या संख्येने ग्राहक होलसेल व किरकोळ फटाक्यांची खरेदी वाडा येथे गर्दी करतात.
वाड्यातील फटाके व्यवसायावर विविध कारणांनी दरवर्षी येणारी संक्रांत अनेक व्यापार्यांना रुचली नसल्याने कित्येक व्यावसायिकांनी यातून माघार घेतली मात्र अजूनही काही विक्रेते आपली पावले घट्ट रोवून वाड्याचे नाव राज्यात गाजवत आहेत. वाड्यात प्रामुख्याने जमीनचक्री, फ्लॉवरपॉट, फुलबाजे, चितपुट, किटकॅट, रॉकेट, कलरिंग शॉट, मटका पाऊस, माळ असे विविध प्रकारचे उत्कृष्ट प्रतीचे व असंख्य फॅन्सी फटाके विक्रीसाठी उपलब्ध असतात.
मोठी रोजगार निर्मिती
वाडा शहरात नावारूपाला आलेल्या फटाका मार्केटने केवळ व्यापार्यांचे उखळ पांढरे होत नाहीत तर या व्यवसायाने परिसरातील जवळपास 200 ते 300 गरजू लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अनेक छोट्यामोठ्या व्यवसायिकांना फटाका व्यवसायाने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा झालेला पाहायला मिळत असुन वाडा शहरात यामुळे चैतन्य निर्माण होते असेही बोलले जात आहे.
इको फ्रेंडली दिवाळीला हरताळ
दिवाळी हा सण उत्साहाचा असुन सर्वत्र आनंदीआनंद असतो. गरीब असो की श्रीमंत प्रत्येकाच्या घरी गोड पदार्थांचा वास येत असुन फटाके फोडण्याचा मोह कुणालाही आवरता येतं नाही. फटाके म्हणजे पैशांचे अतोनात नुकसान व पर्यावरणाची हानी असाही काहींचा सुर असतो मात्र वाड्यातील फटाके ग्राहकांची झुंबड पाहिली की इको फ्रेंडली दीपावली कोण साजरी करतो असा प्रश्न आपल्याला निश्चित पडेल.

