

कसारा : शाम धुमाळ
विहिगाव कसारा वनपरीक्षेत्रच्या तत्कालीन अधिकरी चेतना शिंदे यांची तीन महिन्या पूर्वी प्रशासकीय बदली झाली. बदली नंतर सर्वाधिक मोठे वनपरीक्षेत्र असलेल्या विहिगाव कसारा वनविभागास अध्यापही अधिकारी न मिळाल्याने विहिगाव वन विभागाचा सध्या भोंगळ कारभार पहावयास मिळत आहे. दरम्यान या परीक्षेत्राचा प्रभारी पदभार शहापूर येथील वन विभागाचे अधिकारी शैलेश गोसावी यांचेकडे देण्यात आला होता. परंतु तीन महिन्यात या अधिकाऱ्याने कसारा विहिगाव वन परीक्षेत्रात ढुंकूनही बघितले नसल्याचा आरोप होत आहे. परिणामी कसारा विहिगाव वनपरीक्षेत्र हे जंगल तोड करणाऱ्यांसाठी व वणवे लावणाऱ्यांसाठी सोयीचे ठिकाण ठरत आहे.
विहिगाव वनपरीक्षेत्रात 6 ते 7 बिट येत आहेत् या बिटात मोठ्या प्रमाणात दाट जंगल आहेत. परंतु, जंगलाच्या सुरक्षेसाठी डझन भर कर्मचारी, 1 अधिकारी कार्यरत आहेत. डझन भर कर्मचाऱ्या पैकी 4 ते 5 कर्मचारी नोकरी प्रामाणिकपणे करीत असल्याचे चित्र आहे. कार्यालयाला अधिकारी नसल्याने अनेक कर्मचारी कर्तव्य विसरून कार्यालयीन हजेरी बुकात ऑन ड्युटी दाखवत घरीच दफ्तरी कामकाज् करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. वन परीक्षेत्रातील विहिगावं, दांड उभ्रावणे यांसह् अनेक बिटात मोठ्या प्रमाणात जंगल तोड होत असून. अनेक ठिकाणी वणवा लागण्याच्या घटना घडत आहेत.
वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने अनेक ठिकाणी वणव्यामुळे जंगले व मोठ मोठी झाडे जळून उन्मळून पडत आहेत. परिणामी कार्यालयाला अधिकारीच नसल्याने जंगलातील मौल्यवान वनसंपत्तीची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली असून् साग, खैर, निलगिरी लाकडासह अनेक ठिकाणी वनडोंगरातील माती उत्खनन केले जात आहेत. दरम्यान वनपट्ट्यात लागलेले वणवे असो वा जंगलतोड याबाबतची तक्रार प्रभारी अधिकारी शैलेश गोसावी यांना अनेकदा कळवण्यात आली. परंतु, गोसावी यांनी तक्रारींना केराची टोपली दाखवली आहे.
दरम्यान विहिगावं वन परीक्षेत्राच्या अधिकारी बदलून गेल्यानंतर या ठिकाणचा पदभार नवीन अधिकारी येईपर्यंत 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या खर्डी किंवा वॉशला वन परीक्षेत्रातील वन अधिकाऱ्यांकडे देणे सोईचे होते. असे असताना देखील वनविभागच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी 35 किलोमीटर अंतरावर कार्यरत असलेल्या शैलेश गोसावी यांचेकडे अतिरिक्त भार का दिला? असा सवाल उपस्थित होत असून् कसारा विहिगावंचा प्रभारी चार्ज गोसावी यांनाच का देण्यात आला? या बाबत तर्क वितर्क केले जात आहेत.
दरम्यान विहिगावं परीक्षेत्रातील अतिक्रमण, जगलं तोड व वणव्याबाबत प्रभारी अधिकारी यांना अनेकदा संपर्क केला. परंतु, अशावेळी एकदाही या अधिकाऱ्यांचा फोन लागला नसल्याची खंत विहिगावं येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.