

भिवंडी : भिवंडी शहर व ग्रामीण भागात आगीचे सत्र सुरूच असून भिवंडी तालुक्यातील वळपाडा परिसरात असलेल्या ग्लोबल कॉम्प्लेक्समधील भंगारच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि.7) मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून ही आग सात तासानंतरही धुमसत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील वळपाडा गावाच्या हद्दीत ग्लोबल कॉम्प्लेक्स असून यामध्ये शुभम इंटरियर सोलुशन कंपनी आणि काही भंगाराची गोदाम आहेत. त्यातच शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक भंगार गोदामाला आग लागली. ही आग काही क्षणातच पसरून लगतची आणखी दोन भंगार गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानंतर लगतच शुभम इंटरियर सोलुशन कंपनीला आगीची झळ पोहोचून कंपनीतही भीषण आग लागली. तसेच या आगीमुळे आसपासच्या परिसरातील घरांना देखील झळ पोहोचून नुकसान झाले आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात कागदी पुठ्ठे व प्लास्टिक वस्तू साठवणूक करून ठेवले होते. या भीषण आगीत भंगार गोदामासह इंटरियरचे शोरूम जळून खाक झाले.
खबरदारी म्हणून गोदामा शेजारी असणार्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. दुसरीकडे आगीची घटना माहिती मिळताच भिवंडी महापालिकेच्या 3 बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी दाखल होत आगीवर बर्यापैकी नियंत्रण मिळवले. मात्र सात तासांनंतरही काही ठिकाणी आग धुमसत होती. त्यानंतर घटनास्थळी कुलिंगचे काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी दिली. तर आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याचे सांगण्यात आले. मात्र या घटनेत लाखोंचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणीही जखमी नसल्याचे सांगण्यात आले आहे.
भिवंडी तालुक्यातील वडपा खिंड कुकसे गावात गुरुवारी पहाटेच्या सुमारास कॉस्मेटिक तसेच प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. सदर आग इतकी भीषण होती की या आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले. या गोदामात मोठ्या प्रमाणात कॉस्मेटिक साहित्य तसेच प्लास्टिक वस्तू साठवणूक करण्यात आली होती.
आग लागल्याचे नेमकं कारण अजूनही समजू शकलेले नसून या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल होत पाण्याचा टँकरच्या मदतीने या आगीवर तीन तासात नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले होते.
दरम्यान या आगीच्या घटनेची नोंद करण्यास कंपनीचे व्यवस्थापक आले नसल्याने या आगीत नेमके किती नुकसान झाले आहे, याची माहिती उपलब्ध नसल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी राजेश पवार यांनी दिली. तर स्थानिक भिवंडी तालुका पोलीस ठाण्यातही या आगीच्या घटनेची नोंद केली नसल्याचे पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.