

कसारा (ठाणे ) : कसारा बायपासजवळ मंगळवार (दि.13) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एका घराला भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत लहान मुलगा गुदमरून मृत्युमुखी पडला. ही दुर्घटना त्याच रस्त्याने क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांच्या लक्षात आली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने घरातील ज्वलनशील साहित्य बाहेर काढण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन पथकातील सदस्य अनिल डगळे, बचू ठोबरे, दुर्गेश सोनवणे यांनी अंगावर ओली गोधडी घेऊन घरात प्रवेश केला. त्यांनी माळ्यावर अडकलेल्या मुलाला बाहेर काढून उपचारासाठी तातडीने कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पुढील उपचारासाठी त्याला खर्डी ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले; मात्र रुग्णालयात नेत असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी खासगी पाण्याच्या टँकरची मदत घेण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन पथकातील शाम धुमाळ, दत्ता वाताडे, धर्मेंद्र ठाकूर, सतीश खरे, आकाश भागडे यांच्यासह स्थानिक तरुणांनी दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग नियंत्रणात आणली.
या घटनेची माहिती मिळताच कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावीत आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला. खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांनी पीडित कुटुंबाला धीर दिला आणि शासनाच्या वतीने तातडीने मदत मिळावी असे आदेश प्रशासनाला दिले.
आग विझवण्याचे काम तब्बल तीन तास सुरू होते. घरात असलेल्या मोठ्या लाकडांच्या फळ्या आणि लोखंडी पाईप्स जळून खाली पडत होते. एकीकडे आगीचा प्रचंड उकाडा, तर दुसरीकडे पडणारे जळालेले साहित्य यामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत होते. मात्र मदतकार्य करणाऱ्या पथकाने हिंमतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.