ठाणे : ठाण्यातील मानपाडा परिसरातील दोस्ती एम एम आर डी ए बिल्डिंग नंबर 3 मधील इमारतीच्या डकमध्ये आग लागल्याची घटना मंगळवारी (दि.३०) रोजी रात्री पावणे 9 च्या सुमारास घडली. डकमध्ये लागलेली आग काही वेळातच थेट 22 व्या मजल्यापर्यंत पोहचली.
या इमारतीला सुरक्षा रक्षक देखील नसून बाजूच्या इमारतीमधील सुरक्षा रक्षकाला पहिल्या मजल्यावर धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात अग्निशमन दलाला माहिती दिल्यानंतर अग्निशमन दलाचे तीन बंब आणि आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळी पोहचली आणि एका तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मानपाडा परिसरात एमएमआर-डीएच्या सहा इमारती असून यामध्ये इमारत क्रमांक 3 ही तळ अधिक 22 मजल्यांची इमारत आहे. या इमारतीमध्ये तळ मजल्यापासून 12 व्या मजल्यापर्यंत इमारत रिकामी असून 12 व्या मजल्यापासून 22 व्या मजल्यापर्यंत 12 ते 13 कुटुंब वास्तव्यास आहे. पावणे 9 च्या सुमारास पहिल्या मजल्यावर अचानक मोठ्या प्रमाणात धूर येऊ लागला. हा धूर बाहेरपर्यंत आल्यानंतर बाजूच्या इमारतीमधील सुरक्षा रक्षकाला हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी बाळकूम अग्निशमन दलाला यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच तात्काळ अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन टीम घटनास्थळी दाखल झाली. आग डकमध्ये लागल्याने आग विझवण्यास अडचणी येत होत्या. मात्र एक तासाने आगीवर नियंत्रण मिळवता आले. एमएमआरडीएच्या या इमारती गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असून या इमारतींना कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात येत नाही. त्यामुळे या इमारतींच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.
आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर सर्व विद्युत पुरवठा बंद करण्यात आला. त्यानंतर इमारतीमधील रहिवाशांची एकच तारांबळ उडाली. त्यामुळे काही नागरिक इमारतीच्या खाली पळाले तर काही नागरिकांनी थेट इमारतीची गच्ची गाठली. आग विझल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.