डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या गोग्रासवाडीच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत सोमवारी (दि.२) राडा झाला. या मिरवणुकीत जल्लोष सुरू असतानाच एका तरूणाने मिरवणुकीतील एका तरूणावर काचेच्या बाटलीने हल्ला केला. या हल्ल्यात काचेची बाटली फुटून दोघांना लागली. या हल्ल्यात दोघे जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्याने काही काळ परिसरात गोंधळ निर्माण झाला. हा प्रकार रविवारी (दि.१) रात्री दहा वाजता मातोश्री पोळीभाजी केंद्रासमोरील रस्त्यावर घडला. याप्रकरणी रोहित राजकुमार सोनी (वय २४) याने दिलेल्या तक्रारीवरून गणेश नावाच्या तरूणाविरोधात टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या अधिक माहिती अशी, रविवारी रात्री यातील तक्रारदार रोहित सोनी आणि त्याचे मित्र असिफ शेख, अल्ताफ शेख, समीर शेख आणि राज उशीरे हे गोग्रासवाडीचा राजाच्या आगमन मिरवणुकीत सहभागी झाले होते. गणपतीची मूर्ती मंडपाच्या दिशेने वाजत-गाजत नेण्यात येत होती. या मंडळाचे सदस्य गणपती बाप्पाचा जयघोष करत होते. तक्रारदार रोहितसह त्याचे मित्र असिफ, अल्ताफ, समीर, राज हे देखील आनंदाने या मिरवणुकीत सहभागी होऊन गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करत मिरवणुकीतून चालले होते.
मिरवणूक सुरू असताना अचानक गणेश नावाचा तरूण हातात बाटली घेऊन मिरवणुकीत घुसला. त्याने काही कळण्याच्या आत असिफ शेख याच्या मानेवर बाटली मारली. बाटली काचेची असल्याने तिच्या माऱ्याने फुटून तुटलेल्या बाटलीचा घाव असिफला लागला. तर बाटलीच्या काचा उडून त्याच्या शेजारून चालणाऱ्या राज उशीरे याला लागल्याने त्याच्या नाकाला दुखापत झाली. असिफसह अन्य मित्रांनी तात्काळ हल्लेखोर गणेशला अडवून हे कृत्य तू का केलेस ? म्हणून जाब विचारला. यावेळीही हल्लेखोर गणेश याने आक्रमक भूमिका घेऊन तक्रारदारांना मारहाण करून दुखापत केली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक एस. के. शेख आणि त्यांचे सहकारी फरार हल्लेखोर गणेश याचा शोध घेत आहेत.