ठाणे : वर्तकनगर परिसरात शरीरविक्रयचा व्यवसाय चालवणार्या एका महिला दलालास ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील महिलेच्या तावडीतून तीन मुलींची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाण्यातील वर्तकनगर येथील ठाणे कॅन्टीन, पहिला माळा, शास्त्रीनगर, शंकरनगर नाका येथे एक महिला दलाल तरुणींना शरीरविक्रयासाठी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकास मिळाली होती.
याच माहितीच्या आधारे पोलीस पथकाने एका बनावट ग्राहकाच्या मदतीने काही पंचासह 26 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास सदर ठिकाणी छापा टाकला. यावेळी एका महिला दलालास पोलिसांनी ताब्यात घेऊन तिच्या तावडीतून तीन पीडित तरुणींची सुटका पोलीस पथकाने केली. त्यानंतर महिला आरोपींची चौकशी केली असता त्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट चालवत असल्याचे समोर आले. ग्राहकांना फोटो पाठवून नंतर पैसा व ठिकाण याची सारी डील चॅटिंगच्या माध्यमातून होत होती. सुटका करण्यात आलेल्या तरुणींची सुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी दिली. या प्रकरणी पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.