

कसारा : प्रतीवर्षी पीकविमा हप्ता भरूनही शेतकरी मात्र पीक विम्यापासून वंचित राहतो आहे. पीकविम्याचे पैसे घेऊन पीक विमा कंपन्या मात्र मालामाल होत आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खराब होत चालली आहे. त्यामुळे पीक विमा भरूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येईनात, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावेत, अशी मागणी शहापूर तालुक्यातील शेतकरी करीत आहेत
अवकाळी पावसाने किंवा हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांच्या आबां पिकासह अन्य पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यांचे पंचनामे होऊन चार महिने उलटून गेले, तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर एच.डी एफ.सी.ऍग्रो इन्शुरन्स या पीकविमा कंपन्यांकडून पैसे जमा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसत आहे. शेतकरी पीक विमा भरत असतानाही शहापूर तालुक्याला सातत्याने डावलण्यात आले आहे. वास्तविक, नैसर्गिक आपत्तीच्या वेळेला शेतकऱ्यांसाठी संरक्षण कवच म्हणून विमा कंपन्यांचा उल्लेख होतो. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.
शेतकऱ्यांना पीक विमा मिळेल, अशा घोषणा केल्या होत्या. मात्र, त्या घोषणा हवेतच विरल्या गेल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. दरम्यान विमा कंपनी बोलते शासनाकडून आम्हाला अद्याप पैसे मिळाले नाहीत तर शासन म्हणते पैसे पाठवले तर मग शेतकऱ्यांचा खात्यात विलंब का? असा प्रश्न उपस्थित केला असून विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित विमा रक्कम जमा करावी, यासाठी शहापूर तालुक्यातील आंबा उत्पादक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कृषीाधिकारी, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.