ठाणे जिल्ह्यातील कुपोषणाचा टक्का कमी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष आहार अशी त्रिसूत्री राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या त्रिसूत्रीनुसार पालकांच्या समुपदेशानावर भर देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात आयआयटी मुंबई सारख्या नामांकित संस्थाचा देखील सहभाग घेण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिली आहे.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कुपोषित बालकांच्या प्रमाणात गेल्या काही महिन्यात घट होत असली तरी, ठाणे जिल्हा शंभर टक्के कुपोषण मुक्त करण्याचा मानस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी व्यक्त केला आहे. गरोदरपणात मातेला योग्य आहार न मिळाल्यास मूल कुपोषित जन्माला येण्याची शक्यता असते. तर मूल जन्मल्यानंतर त्याला मातेचे पुरेसे दूध व पोषण आहार न मिळाल्यास बालके कुपोषणाच्या विळख्यात अडकू शकतात. त्यामुळे गरोदरपणात व प्रसूतीनंतर मातांना व सहा महिन्यांनंतर बालकांना नियमितपणे पोषण किट वाटप केले जात आहे.
वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना घुगे यांनी त्याठिकाणी केलेला प्रयोग ठाणे जिल्ह्यात राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये त्रिसूत्रीनुसार काम करण्यात येत आहे. पालकांचे समुपदेशन करणे हा यातील महत्वाचा भाग असून यासोबतच आयआयटी सारख्या संस्थांचा सहभाग घेऊन कुपोषित बालकांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. त्यामुळे 1 हजार दिवस सॅम बालके निगराणीखाली राहणार आहेत. पालकसभा घेऊन मुलांचा दिनक्रम, आहाराच्या वेळा, चविष्ठ आणि तितकेच सकस अन्न कसे तयार करावे, याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
दुसरीकडे अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांना देखील प्रशिक्षण देण्यात येत असून अतितीव्र कुपोषित बालकांपासून मध्यम कुपोषित बालकांमध्ये त्यांचे रूपांतर कसे होईल, याचे प्रशिक्षण दिले जात आहे. तर प्रत्यक्ष सकस आहार कुपोषित बालकांना कसा मिळेल, यावर कटाक्षाने भर दिला जाणार असल्याचे घुगे यांनी सांगितले. अंगणवाडी सेविकांतर्फे दर महिन्याला बालकाचे वजन घेतल्यानंतर चार प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जात असते. त्या बालकांचे वजन आणि उंची वाढीच्या दृष्टीने आहाराचे नियोजन करण्यात येत आहे.
वर्ध्यामध्ये कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी 58 हजार बालकांचे स्क्रीनिंग करण्यात आले होते. याचसोबत गरोदर मातांमध्ये पोषण आहाराबाबत प्रबोधन करण्यात आले होते. त्यांना पोषण किट्सचे वाटप देखील केले होते. या सर्व प्रयत्नांमुळे 90 टक्के कुपोषित बालकांचे प्रमाण कमी झाले असल्याची माहिती घुगे यांनी दिली आहे. जिल्ह्यातील शहापूर तालुका आदिवासी तालुका आहे. या तालुक्यात सॅम आणि मॅम कुपोषित बालकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे आता याठिकाणी कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे घुगे यांनी सांगितले.
ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी होत आहे. कुपोषण निर्मूलनासाठी त्रिसूत्रीचा पॅटर्न प्रभावी ठरेल. कुपोषण मुक्तीसाठी प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
रोहन घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, ठाणे