

डोंबिवली : सद्या परतीच्या पावसाने वाट धरली आहे. ऑक्टोबर हीटने वातावरणात प्रचंड उष्णतामान वाढले आहे. अशा परिस्थतीमध्ये कामाच्या ठिकाणी जाण्याकरिता सकाळी, तर कामाहून परतताना संध्याकाळी चाकरमान्यांच्या अंगाची लाही लाही होताना दिसत आहे.
गर्दीच्या वाढत्या लोंढ्यांमुळे लोकल प्रवाशांची प्रचंड घुसमट होताना दिसत आहे. एकीकडे उष्णतेच्या काहीलीपासून बचाव करण्यासाठी एसी लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली आहे. तर दुसरीकडे जीव मुठीत धरून महिला प्रवाशांना तारेवर कसरत करावी लागत आहे. त्यातच गर्दीमुळे होणार्या अपघातांपासून बचाव करण्यासाठी प्रवाशांना डब्यात लोटताना कल्याण-डोंबिवली स्थानकांत सुरक्षा जवानांची दमछाक होत असते.
ऑक्टोबर हीटमुळे वातावरणात प्रचंड उकाडा जाणवत असताना दुसरीकडे या लोकलमधील प्रवासी घामाघुम होताना दिसत आहेत. घायाळ करणार्या या उष्णतेमुळे कोंडमार्यात अडकून चेपणार्या प्रवाशांना उष्माघाताच्या त्रासचा सामना करावा लागत आहे. प्रचंड उकाडा आणि त्यातच घामाच्या वाहणार्या धारांमुळे जनरल लोकलमध्ये होणार्या चेंगराचेंगरीतून प्रवास करण्यापेक्षा बहुतांशी प्रवासी एसी लोकलला पसंती देऊ लागले आहेत. कल्याण, टिटवाळा आणि बदलापूर स्थानकांतून सकाळच्या सत्रात सुटणार्या एसी लोकलमध्ये प्रवाशांची तुफान गर्दी असते. गर्दीच्या लोट्यामुळे ऐसी लोकलचे दरवाजे बंद होत नाहीत. त्यामुळे या रेल्वे स्थानकांवरील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि विशेष जवानांवर प्रवाशांना लोकल डब्यात लोटण्याची जबाबदारी दररोज पार पाडावी लागते. जोपर्यंत दरवाजे बंद होत नाहीत, तोपर्यंत लोकल सुरू होत नाही. लोकलचे दरवाजे बंद होण्यासाठी दारात लटकणार्या प्रवाशांना आत लोटण्यासाठी ताकदीचा वापर करावा लागतो. ही लोकल सुरू होईपर्यंत जवानांची दमछाक होत असते.
सद्या एसी लोकलमध्ये गर्दी वाढली आहे. घामाच्या धारा थांबतात. कपड्यांचा चिकचिकाट होत नाही. उकाड्याच्या त्रासापासून थोडीफार मुक्ती मिळते. किमान थंडगार वातावरणात सुखाने प्रवास करता येतो, असा विचार करून बहुतांशी प्रवासी एसी लोकलने प्रवास करणे पसंत करतात. वाढती गर्दी आणि डब्यातील चेंगराचेंगरीमुळे तपासणीस सकाळ-संध्याकाळच्या वेळेत तिकीट तपासणीसाठी फिरकत नाहीत. त्यामुळे जनरल लोकलमधील प्रवासीही एसी लोकलमध्ये घुसखोरी करून प्रवास करत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
डोंबिवलीतून सकाळी नऊच्या दरम्यान सीएसएमटीकडे एसी लोकल गेल्यानंतर थेट सव्वादहा वाजता कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी एसी लोकल आहे. डोंबिवली स्थानकातून साडेआठ ते नऊच्या दरम्यान मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला की कार्यालयीन वेळेत मुंबईत पोहोचता येते. त्यामुळे नऊच्या वेळेत एसी लोकलमध्ये प्रवाशांची तुडुंब गर्दी असते. नऊची एसी लोकल पकडण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. त्यामुळे या लोकलचे दरवाजे बंद होतात की नाही याची पर्वा न करता प्रवासी लोकलमध्ये घुसतात.
अनेक प्रवासी दरवाजात लटकून राहतात. अशा प्रवाशांमुळे लोकलचा दरवाजा बंद होत नाही. दरवाजा बंद होत नाहीत तोपर्यंत एसी लोकल सुरू होत नाही. त्यामुळे कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांवरील रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि विशेष जवान प्रत्येक डब्याजवळ उभे राहून दरवाजात लटकणार्या महिला आणि पुरूष प्रवाशांना डब्यात ढकलण्याचे काम करत आहेत. हे काम आम्हाला नेहमी करावे लागते. उन्हाळ्यात त्रास सहन करावा लागतो. पाऊस सुरू झाल्यानंतर एसी लोकलला गर्दी कमी होते. वातावरणात थंडावा निर्माण झाला की लोटालोटीचा त्रास कमी होतो, असे सुरक्षा बलाच्या जवानाने सांगितले.