

विरार : किरकोळ बाजारात अद्यापही टोमॅटो दर कमी होताना दिसत नसल्याने त्याचा फटका हॉटेल्स चालकांना बसत आहे. पदार्थांमध्ये केल्या जाणार्या टोमॅटोच्या वापराने पदार्थ बनविण्यावरची लागत वाढल्याने हॉटेल्सच्या मुळ नफ्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे टोमॅटोच्या सर्व पदार्थांचे दर वाढवण्याचे संकेत हॉटेल्स चालकांनी दिले आहेत. असे झाले तर हॉटेलमधील जेवणासाठी वसईकरांना नेहमीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
तूर्त अचानक दर वाढवता येत नसल्याने अनेक हॉटेल्समधून कोशिंबीर आणि सॅलडमधून टोमॅटो वजा केला आहे. ज्या ठिकाणी टोमॅटोला पर्यायी पदार्थ वापरला जाऊ शकतो तिथे टोमॅटोची रिप्लेसमेंट केली जात आहे, अथवा केचपचा वापर केला जात आहे. फ्रँचायझी उपाहारगृहे मात्र नाईलाजाने अजूनही टोमॅटोचा वापर करत आहेत. उपाहारगृहातील बहुतांश पदार्थात टोमॅटोचा वापर होतो. त्यातही शुद्ध शाकाहारी उपाहारगृहांत टोमॅटोचा वापर तुलनेने अधिक असतो. कोणताही रस्सा टोमॅटोशिवाय होत नाही. साऊथ इंडियन उपाहारगृहांत सांबार आणि वेगवेगळ्या चटणीत पावभाजी, टोमॅटो सूप, टोमॅटो ऑम्लेट, सलाड यात टोमॅटो अधिक वापरला जातो. टोमॅटोचे दर जसजसे वाढू लागले तसा नफा घटला. कोशिंबीरमधून टोमॅटो गायब केला तरी अन्य पदार्थांत तो वापरावाच लागत असल्याने रोज टोमॅटो दरवाढीचा फटका बसत आहे.
मागील महिन्यापासून दर वाढल्याने सूप आणि जेवणातून टोमॅटो वगळण्यात येत आहे. फेस्ट आणि कॅन असे दोन प्रकारचे टोमॅटो वापरले जातात. बाजारात टोमॅटोची रेडिमेड प्युरी मिळते. परंतु चवीमध्ये फरक पडतो. टोमॅटोची चव पदार्थाला देण्यासाठी दही किंवा चिंचेचा वापर करता येतो. सध्या हॉटेलमध्ये डिशला लाल रंग देण्यासाठी लाल शिमला मिरची वापरली जात आहे. विरार मधील एका हॉटेलचे मालक विनोद सोनावने यांनी सांगितले आहे. सध्या किरकोळ बाजारात टॉमॅटो 80 ते 100 रुपये किलोने विकले जात आहेत.
टोमॅटोचे दर काही दिवसांत कमी होतील असे वाटत असताना मागील महिन्यापासून दर वाढतच आहेत. यामुळे उत्पन्नात घट झाली. अद्यापही हॉटेलवाल्यांनी दरवाढ केलेली नाही. येत्या काळात दर कमी न झाल्यास मात्र असोसिएशनच्या पातळीवरच पदार्थांचे दर वाढवण्याचा विचार केला जाईल.
आकाश श्रीवास्तव, उपाहार गृहाचे मालक, ठाणे
नफ्यात साधारण 500 ते 700 रुपयांची दिवसाला घट झाली आहे. यामुळे येत्या काळात जर टॉमॅटोचे दर कमी झाले नाहीत तर वसईकरांना हॉटेलमध्ये जेवणासाठी अधीक पैसे मोजावे लागणार आहेत.
राकेश यादव, सँडविचवाले, ठाणे.