

ठाणे : राजस्थान मधून तस्करी करून ठाण्यात आणलेल्या एमडी ड्रग्जची विक्री करणार्या एका ड्रग्ज पेडलर्सला ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने 9 सप्टेंबर 2025 रोजी कळवा खारेगाव टोलनाका परिसरातून अटक केली होती. या ड्रग्ज विक्रेत्याच्या चौकशीतून त्याने हे ड्रग्ज राजस्थान राज्यातील एका गावातून हे ड्रग्ज खरेदी करून ठाण्यात आणल्याचे समोर आले आहे. त्यातर ठाणे पोलिसांनी 12 सप्टेंबर रोजी आणखी एका ड्रग्ज तस्करास अटक केली आहे.
सुरेशसिंह गंगासिंह तंवर (35, किसनगड, रतलाम, मध्य प्रदेश) आणि कुलदीपसिंह परिहार अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अटकेतल्या आरोपीकडून 75 लाख 22 हजार रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी कळवा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कळवा खारेगाव येथून मुंब्रा व डायघर परिसरात विक्रीसाठी एक जण एमडी ड्रग्ज घेऊन जाणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकास मिळाली होती. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा लावून 9 सप्टेंबर रोजी रात्री ड्रग्ज पेडलर्स सुरेशसिंह गंगासिंह तंवर यास त्याच्या हुंडाई कारसह ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडे तब्बल 501.50 ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आढळून आले.
पोलिसांनी हे ड्रग्ज जप्त केले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने हे ड्रग्ज त्याचे दोन साथीदार अभिषेक जैस्वाल व कुलदीपसिंह परिहार यांच्या मदतीने राजस्थानच्या मध्य प्रदेश सीमेवरील एका गावातून आणल्याचे सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने कुलदीपसिंह परिहार यास देखील 12 सप्टेंबर रोजी अटक केली. दोघांच्या ताब्यातून 75 लाख 22 हजार 500 रुपये किमतीचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. अटकेतले दोघे ड्रग्ज पेडलर्स परराज्यातील असून त्यांनी यापूर्वी देखील अमली पदार्थ विक्रीचे गुन्हे केले आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत.