

डोंबिवली : फुफ्फुसांवर घातक परिणाम करणाऱ्या औषधांचा चक्क नशेसाठी वापर केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई काचोरे गावातील शिवमंदिराजवळ शनिवारी (दि.११) सायंकाळीच्या सुमारास टिळकनगर पोलिसांनी केली.
इरफान इनामुद्दीन शेख (३१, रा. स्नेह वर्धक नगर, पत्रीपुल, होमबाबा टेकडी, कल्याण-पूर्व) आणि सोहेल हारून शेख (२३, रा. सर्वोदय रेसिडन्सी, पत्रीपुला जवळ, कल्याण-पश्चिम) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून त्यांच्याकडून १९२ कोडीनयुक्त प्रतिबंधीत औषधाच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.
कल्याण-डोंबिवलीतील पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंमली व नशिल्या पदार्थांची विक्री होत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश डीसीपी अतुल झेंडे यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार तपास करत असताना कोडीनयुक्त प्रतिबंधीत औषधाची नशेसाठी विक्री करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी काचोरे गावातील शिवमंदिराजवळ इरफान शेख व सोहेल शेख या दोघांना कोडीनयुक्त प्रतिबंधीत औषधाच्या बाटल्यांची विक्री करत असताना पोलिसांनी ताब्यात घेतले. सरकारने बंदी घातलेल्या या बाटल्यांची बाजारभावाने किंमत ४३ हजार २०० रूपये आहे. नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या १९२ बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या. या संदर्भात पोलिस शिपाई गौतम जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपी इरफान शेख आणि सोहेल शेख यांनी या बाटल्या कुठून आणल्या? त्या काय भावात कुठे आणि कुणाला विकल्या जाणार होत्या ? याचा चौकस तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एच. डी. राऊत आणि त्यांचे सहकारी करत आहेत.