

डोंबिवली (ठाणे) : इंडो-भुटान इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप - २०२५ अंतर्गत आयोजित दुसरी साऊथ एशियन मर्दानी स्पोर्ट चॅम्पियनशिप स्पर्धा १७ ते १९ जून दरम्यान भुटान शोटोकान कराटे असोसिएशनच्या वतीने पार पडली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या १२ वर्षीय सई दिनकर सोमासे हिने ३ रौप्य पदकांची कमाई करत महाराष्ट्रासह भारताचे नाव उज्वल केले. सई ही डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण शाखेमध्ये ट्रॅफिक वॉर्डन म्हणून कार्यरत असलेले दिनकर सोमासे यांची कन्या आहे.
सई सोमासे हिने मर्दानी खेळ, काता स्पर्धा आणि कराटे फाईट अशा तिन्ही प्रकारांत सहभाग घेतला. या तिन्ही प्रकारांमध्ये सिल्वर मेडल (रौप्य पदक) पटकावले. सई ही महात्मा गांधी विद्यालयामध्ये सातव्या इयत्तेत शिकत असून अतिशय खडतर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सईने आंतरराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत आपली चमक दाखवली.
या स्पर्धेत सईसह डोंबिवलीतील अनेक खेळाडूंनी भाग घेतला आणि यश मिळवले. अमन शहू, गणेश मांजरेकर, प्रत्युष टंनकर, अनुज देसले, वंश अध्यापक, आयुष घुमरे, रूद्र घाडीगावकर, अरीत्रा कांची, स्वरांगी परदेशी, जीया कदम, आर्या कारंबलेकर आणि पूजा धाबाडे या सर्व खेळाडूंनीही विविध प्रकारांत पदकांची लयलूट करत डोंबिवलीचे नाव भुटानमध्ये उज्ज्वल केले. या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सुनील वडके यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी महिनाभर खेळाडूंना अत्यंत शिस्तबद्ध आणि कौशल्यपूर्ण प्रशिक्षण दिले. सुनील वडके यांनी या आधी देखिल अनेक खेळाडूंना घडवले असून कराटे क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. सई सोमासेच्या या यशाबद्दल डोंबिवलीसह सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.