

Dombivli Theft Gang Arrested
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेकडे असलेल्या मोठागाव परिसरात निर्माणाधीन नामांकित स्कूलमधून सुमारे १५ लाख रूपये किंमतीच्या ॲल्युमिनियम प्लेट्सची चोरी करणाऱ्या बदमाशांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. चोरीचा माल नेण्यासाठी आलेला टेम्पो चालक रस्ता चुकल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि याच फुटेजच्या आधारे ५ जणांच्या टोळक्याला विष्णूनगर पोलिसांनी मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
विशेष म्हणजे चोरी करून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा एका टेम्पो चालकाच्या चुकीमुळे पर्दाफाश झाला आहे. चोरीचा माल घेऊन जाण्यासाठी आलेला टेम्पो चालक रस्ता विसरल्याने दुसऱ्या मार्गाने गेला. याच दरम्यान त्याचा टेम्पो सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आणि पोलिसांना टोळीपर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा पुरावा मिळाला.
मोठागाव परिसरात निर्माणाधीन नामांकित स्कूलमधून सुमारे १५ लाख रूपये किंमतीच्या ॲल्युमिनियम प्लेट्सची चोरी झाली होती. या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. मोठागाव परिसरात नामांकित स्कूलच्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या ॲल्युमिनियम प्लेट्सवर चोरट्यांनी डल्ला मारला होता. या चोरीप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी मोठगाव-माणकोली पुलाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक संशयित टेम्पो आढळून आला. चोरीच्या रात्री ॲल्युमिनियम प्लेट्स घेऊन जाण्यासाठी आलेल्या टेम्पो चालकाचा मोठा गाव परिसरात रस्ता चुकला होता. त्यामुळे त्याने दुसऱ्या रस्त्याने प्रवास केला. याच मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टेम्पो कैद झाल्याने पोलिसांना तपासाची दिशा मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी मोबाईल कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे बदमाशांचा माग काढला. या कारवाईत अमित कुमार, राहुल प्रल्हाद, आदित्य खांजोडे, प्रकाश घोलप आणि सागर घाटल या पाच बदमाशांना अटक करण्यात आली. यातील अमित कुमार हा टोळीचा म्होरक्या असून त्याचा भंगार विक्रीचा व्यवसाय असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी चोरीला गेलेल्या ॲल्युमिनियम प्लेट्स जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील एक बदमाश अद्याप फरार असून पोलिस त्याचाही शोध घेत आहेत.