

Atal Setu to Gateway of India Swimming
डोंबिवली : ओम कुणाल भंगाळे (८) हा डोंबिवलीतील ओमकार इंटरनॅशनल शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेत आहे. लहानपणापासूनच पोहण्याची विशेष आवड असून, ही आवड जोपासण्यासाठी त्याने डोंबिवलीतील यश जिमखान्यातील प्रशिक्षक विलास माने यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरण प्रशिक्षण सुरू केले. याच ओमने अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत १७ किलोमीटर सागरी अंतर २ तास ३३ मिनिटांत यशस्वीरित्या कापून डोंबिवलीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
स्विमिंग पूलमध्ये सराव करत असतानाच ओमच्या मनात समुद्रात पोहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. विशेष म्हणजे यापूर्वी तो कधीही समुद्रात गेला नव्हता. केवळ स्विमिंग पूलमध्येच त्याचा सराव झाला होता. तरीही त्याने समुद्रात पोहण्याची इच्छा आई-वडील आणि आजोबांजावळ व्यक्त केली होती. कुटुंबात यापूर्वी कोणालाही असा अनुभव नसतानाही ओमच्या आई-वडिलांनी त्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. ओमने समुद्रात ३ सराव सत्रे पूर्ण केली. त्यानंतर संतोष पाटील यांनी स्विमिंग पूलमधील सरावाचा कालावधी वाढविण्याचा सल्ला दिला. प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांनी त्याच्याकडून दररोज ३ ते ४ तास कठोर सराव करून घेतला.
८ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजून २३ मिनिटांनी अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडियापर्यंत १७ किलोमीटर अंतर पोहण्याचा उपक्रम निश्चित करण्यात आला. अरबी समुद्रात अटल सेतू परिसरात समुद्रदेवतेची पूजा करून ओमच्या शरीरावर ग्रीस लावण्यात आले. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली ओमने समुद्रात झेप घेतली. त्यावेळी वातावरण अत्यंत थंड होते. अंधार, थंड वारा, मोठ्या जहाजांच्या लाटा आणि समुद्रातील तेलकट पाण्यामुळे होणारी अस्वस्थता, अशा प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत ओमने आपली पोहण्याची गती कायम ठेवली.
पाण्यावर असलेल्या तेलाच्या थरामुळे मळमळ्यासारखे होत असतानाही त्याने हार मानली नाही. अखेर २ तास ३३ मिनिटांत ओमने अटल सेतूपासून गेटवे ऑफ इंडिया पर्यंतचे १७ किमीचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पूर्ण केले. गेटवेवर पोहोचताच उपस्थित नागरिक, प्रशिक्षक विलास माने, संतोष पाटील, पिराजी तसेच नातेवाईकांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले. ओमच्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीला सर्वत्र सलाम केला जात आहे. दरम्यान, ओमचे पुढील लक्ष्य आणखी मोठे असून धरमतर (अलिबाग) ते गेटवे ऑफ इंडिया असे तब्बल ३६ किमीचे सागरी अंतर पोहत पार करण्याचा त्याचा संकल्प आहे.