ठाणे : डोंबिवली-मुंब्रा प्रवासात संकटांची मालिका नित्याची

Dombivli - Mumbra journey : पाठीवरच्या बोजासह रेटारेटीमुळे अपघातांना निमंत्रण
एसी लोकल
पोलीसांना पकडावे लागतात प्रवाशांचे पाय : एसी लोकलचे दरवाजे बंद होण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी सुहास मनोहर स्वतः प्रवाशांचे पाय पकडून आतमध्ये ठेवत आहेत.pudhari news network
Published on
Updated on
डोंबिवली : बजरंग वाळुंज

लोकलमधील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वे मार्गावरील कळवा आणि मुंब्रा स्टेशनवर फास्ट लोकल थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 5 ऑक्टोबरपासून या निर्णयाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली आहे. तरीही मध्य रेल्वेवरील गर्दी कमी झालेली दिसत नाही. रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानंतर प्रवाशांना गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे.

Summary

रेल्वे प्रशासनाच्या निर्णयानंतरही लोकल गर्दीतून पडून प्रवाशांचे मृत्यू होण्याचे सत्र सुरू आहे. या साऱ्या अपघातांना पाठीवरच्या बोजासह रेटारेटीमुळे निमंत्रण मिळत असल्याने घुसमटलेल्या गर्दीतून डोंबिवली ते मुंब्र्यापर्यंत प्रवास धोकादायक ठरत असल्याचे चित्र दिसून येते.

डोंबिवली ते मुंब्रा लोकल प्रवासादरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. डोंबिवली हे मध्य रेल्वे मार्गावरील प्रचंड गर्दीचे रेल्वे स्थानक आहे. रेल्वे प्रवाशांकडून डोंबिवलीहून सुटणार्‍या लोकल गाड्यांमध्ये वाढ करण्याची मागणी आहे. लोकलच्या फेर्‍या वाढवण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र या मागणीकडे रेल्वे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे. या मार्गावर रेल्वे आणखी किती प्रवाशांचा बळी घेणार ? असा सवाल आता प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

एसी लोकल
लोकलच्या दरवाजात लोंबकळत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांसह लोहमार्ग पोलिसांना दररोज अशी ताकद पणाला लावली लागते.pudhari news network

लोकलमधील वाढती गर्दी, प्रवाशाच्या पाठीवरील ओझे आणि त्यातच रेटारेटी या तिन्ही समस्या अपघातांना कारणीभूत ठरत असतात. डोंबिवली ते मुंब्रा नवीन रेल्वे मार्गाला असलेली वळणे देखिल लोकलच्या दरवाजात लोंबकळत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मृत्यू कारणीभूत असल्याचे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून अनुभव घेणाऱ्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

यापूर्वी प्रवासी कल्याण ते ठाणे अतिजलद लोकलने मुंब्र्यातील पारसिक बोगद्यातून प्रवास करत असत. लोकलला गर्दी त्यावेळीही असायची. प्रवासी दरवाजाला लोंबकळत किंवा दरवाजाच्या मधल्या दांड्याला धरून प्रवास करायचे. तथापी त्यावेळी इतके अपघात होत नव्हते. आता दिवा, कोपर, डोंबिवली, कल्याणपासून पुढच्या देखिल परिसराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. मुंबईकळे जाणारा नोकरदार वर्ग वाढला आहे. प्रत्येकाची कामावर वेळेत जाण्याची धडपड असते. त्यातच लोकल वेळेवर धावत नसतात. मिळेल ती लोकल पकडून जाण्यासाठी केली जाणारी धडपड प्रवाशांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचे जुने प्रवासी सांगतात.

यापूर्वीच्या कसारा, कर्जत, खोपोली भागातून येणाऱ्या अतिजलद लोकल प्रत्येक स्थानकावर वेळेत यायच्या. कल्याण-डोंबिवलीतील प्रवासी 55 ते 60 मिनिटांमध्ये सीएसएमटीला पोहोचायचा. या लोकल आता 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असतात. या लोकलने नियमित जाणारे प्रवासी इतर लोकलमधून प्रवास करतात. एसी लोकलचे तिकीट महागडे असल्याने मोजकेच प्रवासी तिकीट काढून किंवा पास काढून प्रवास करायचे. आता सामान्य लोकलचे तिकीट असलेला प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करताना आढळून येतो.

वक्री धावणाऱ्या लोकलला लटकणे धोक्याचे

पाठीवरील बोजासह प्रवासी दरवाजात लोंबकळत प्रवास करत असेल तर डोंबिवलीहून कोपर ते मुंब्र्या दरम्यानच्या रेल्वे मार्गातील एखादा खांबाला जोराने धडकून प्रवासी त्याच्याकडील बोजासह रेल्वे मार्गात पडतो. कोपर स्थानकानंतर मुंब्र्याच्या दिशेने धिमी वा अतिजलद लोकल जाताना वळणे (वक्री) घेत धावत असते. अशा वेळी डब्यातील प्रवाशांचा जोराने रेटा आल्यानंतर लोकलच्या दरवाजात लोंबकळणारा प्रवासी बाहेर फेकला जाऊन रेल्वे मार्गात कोसळतो.

चढाओढीमुळे धोक्याची घंटा

यापूर्वी डोंबिवली आणि कल्याणहून सुटणाऱ्या लोकल कल्याण-डोंबिवलीकर प्रवाशांसाठी हक्काच्या लोकल होत्या. आता कल्याण लोकलमध्ये कोपर आणि डोंबिवलीचे प्रवासी कल्याणच्या दिशेने उलट प्रवास करून पुन्हा मुंबईचा प्रवास सुरू करतात. डोंबिवली लोकलमध्ये मुंब्रा आणि दिव्याच्या उलट दिशेेने प्रवास करतात. कार्यालयीन वेळेवर जाण्यासाठीची ओढ कर्मचाऱ्यांना जीवघेणा धोका देते. यापूर्वीच रेट्रोचे रेक 60 ते 70 किमी वेगाने धावायचे.आताचे सिमेन्स, बम्बार्डियाचे रेक 70 ते 80 किमी वेगाने धावतात. नवीन रेल्वे मार्गावर या रेकना वेग असल्याने लोंबकळत असलेल्या प्रवाशांना त्याचा फटका बसतो.

घुसखोरांकडून प्रवासाचा हक्क हिरावला जातोय

प्रवाशांची वाढती गर्दी आणि कामावर वेळेत पोहोचण्याची धडपड यामुळे प्रवाशांचे लोकल प्रवासातील मृत्यू वाढत असल्याची चिंता प्रथमेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली. तर उलट दिशेने बसून येणारे प्रवासी स्थानिक प्रवाशांच्या लोकलमध्ये शिरकाव करून प्रवासाचा हक्का हिरावून घेतात. त्यामुळे प्रवासी मिळेल त्या लोकलने प्रवासासाठी धडपडत असतो. या उलटमार्गी दरवाजा अडवून बसणाऱ्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलासह लोहमार्ग पोलिस कारवाई करत नाहीत. त्याचा फटका लोंबकळत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असल्याचे तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेच्या अध्यक्षा तथा उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी स्पष्ट केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news