

डोंबिवली : पश्चिम डोंबिवलीतील कोपर गावात राहणाऱ्या एका गरजूची आंबिवली (मोहने) येथील एकाने त्याच्या साथीदारांसह नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 8 लाख 67 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. नोकरी न लावता घेतलेले पैसेही परत न केल्याने अखेर डोंबिवलीतील तरूणाने संबंधितांविरूध्द दाखल केलेल्या तक्रारीवरून मंगळवारी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सप्टेंबर 2020 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. सतीश बबन भोसले असे फसवणूक झालेल्या तरुणाचे असून हा तरूण यापूर्वी डोंबिवली पूर्वेतील नांंदिवली रोड परिसरात राहत होता. मोहने गावातील चाळीत राहणाऱ्या एका व्यक्तीसह त्याच्या साथीदारांनी ही फसवणूक केली आहे. पोलिसांनी फसवणूक झालेल्या सतीश भोसलेच्या तक्रार अर्जाची चौकशी करून वरिष्ठांच्या मंजुरीने संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सतीश भोसले याने मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण यापूर्वी डोंबिवली पूर्वेत नांदिवली रोड परिसरात राहत होतो. मोहने (आंबिवली) भागात राहणाऱ्या एक व्यक्तीने आणि त्याच्या साथीदारांनी परिचय करून आपला विश्वास संपादन केला. आपली वरिष्ठ पातळीवर ओळख आहे. आपण नोकरी लावण्याची कामे करतो, असे सांगितले. स्टाफ सिलेक्शन कमिशन, एनटीपीसी लिमीटेड, पत्रातु झारखंड याठिकाणी नोकरी लावण्याचे अमिष दाखविण्यात आले. नोकरी लावण्याच्या बदल्यात आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी आपल्याकडून 8 लाख 68 हजार रूपये उकळले.
पैसे स्वीकारल्यानंतर त्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन दिल्ली, पत्रातु झारखंड, एनटीपीसीची बनावट कागदपत्रे देऊन नोकरी लागेल असा देखावा निर्माण केला. पैसे उकळून पाच वर्ष उलटली तरीही नोकरी काही लागली नाही. फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्याकडे घेतलेले पैसे परत करण्याचा तगादा लावला. वारंवार मागणी करूनही पैसेही परत न केल्याने पोलिसांकडे तक्रार अर्ज सादर केला होता. पोलिसांनी या अर्जाची चौकशी करून वरिष्ठांच्या आदेशांनुसार मोहने भागात राहणारा व्यक्ती व त्याच्या साथीदारांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ बनसोडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.