डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा: पूर्वेकडील मानपाडा रोडला असलेल्या पांडुरंगवाडीत राहणाऱ्या सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्याला मुंबईकर भामट्याने तब्बल 2 कोटी 81 लाखांचा चुना लावला. या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल असून गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील लालबागच्या गणेश गल्लीत राहणाऱ्या भामट्याने सोन्याची बनावट नाणी देऊन फसवणूक केली आहे. हा गुन्हा पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
हितेश रमेश गांधी (वय 43) असे फसगत तक्रारदार झालेल्या डोंबिवलीकर व्यापाऱ्याचे नाव आहे. ते डोंबिवलीतील मानपाडा रोडला असलेल्या पांडुरंगवाडी भागात राहतात. हितेश यांचे डोंबिवलीत सोन्या-चांदीच्या दागिने विक्रीचे दुकान आहे. मागील तीन महिन्यांच्या कालावधीत फसवणुकीचा प्रकार घडला आहे. पमेश सुरेंद्र खिमावत असे फसवणूक करणाऱ्या भामट्याचे नाव आहे. तो मुंबईतील लालबागच्या गणेशगल्ली परिसरात राहतो.
याबाबत अधिक माहिती अशी की, तीन महिन्यांपूर्वी तक्रारदार हितेश गांधी यांच्या खास परिचयातील रमेश जैन यांनी आपल्या ओळखीच्या पमेश खिमावत यांच्याकडे सोन्याची नाणी असल्याचे सांगितले. वालकांबी सुईस कंपनीची ही नाणी त्यांना विकायची असल्याचे सांगितले. ओळखीच्या व्यक्तिमार्फत सोन्याची नाणी सहज आणि स्वस्त भावात विकत मिळत असल्याने हितेश यांनी पमेश खिमावत याच्याशी व्यवहार करण्याचे ठरविले. प्रत्येक नाणे 100 ग्रॅम वजनाचे असल्याचे पमेश याने सांगितले. ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांच्या कालावधीत 3 हजार 700 ग्रॅम वजनाची वालकांबी सुईस कंपनीची वेष्टनात लपेटलेली 37 नाणी 2 कोटी 81 लाख 10 हजार रूपयांना खरेदी केली.
सध्या सोन्याचा दर कडाडलेला असल्याने स्वस्त भावात विकत घेतलेल्या नाण्यांच्या विक्रीतून मोठा नफा मिळेल, असा विचार करून हितेश गांधी यांनी रमेश जैन यांच्यामार्फत पमेश खिमावत याला निरोप देऊन आणखी काही सोन्याची नाणी विकत घेण्याची मागणी केली. मात्र, पमेश खिमावत याने असा व्यवहार आपण करत नाही आणि ती सोन्याची नाणी विकू शकत नाही, असा निरोप हितेश यांना दिला. त्यामुळे हितेश गांधी यांना संशय आल्याने त्यांनी सिलबंद असलेले सोन्याचे नाणे बाहेर काढून ते तज्ज्ञाकडून तपासून घेतले. तज्ज्ञाने सदर नाणे बनावट असल्याचे सांगताच हितेश यांनी सर्व नाणी तपासून घेतली ती सर्व नाणी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. हितेश यांनी ही सर्व बनावट नाणी परत घेऊन आपले घेतलेले सर्व पैसे परत करण्यासाठी पमेश खिमावत याच्यामागे तगादा लावला.
मात्र, पमेश याने हितेश गांधी यांना प्रतिसाद देणे बंद केले. एकीकडे आपला विश्वासघात करून आर्थिक फसवणूक केल्याची खात्री पटल्यानंतर हितेश गांधी यांनी पमेश खिमावत याच्या विरोधात पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तर दुसरीकडे पमेश खिमावत फरार झाला आहे. पोलिसांनी या गुन्ह्याची कागदपत्रे पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे पाठवली आहेत.