

भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली यंदाच्या दिवाळी सानुग्रह अनुदान (बोनस) वाटपाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली असता त्यात मागील दोनवर्षीच्या बोनसमध्ये यंदा 5 टक्के म्हणजेच 1 हजार 236 रुपयांची वाढ करीत 25 हजार 953 रुपये बोनस जाहीर केला आहे. यंदाच्या बोनसमधील 5 टक्के वाढीवर कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केला.
तत्पूर्वी पालिकेतील विविध कर्मचारी संघटनांनी यंदाच्या दिवाळीत सुमारे 27 हजार 500 रुपये बोनस देण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी मागील दोन वर्षांप्रमाणेच यंदाही 24 हजार 717 रुपये बोनस देण्यास मान्यता दिली. मात्र त्याला विविध कामगार संघटनांनी विरोध करीत पालिकेने 2024-25 मधील अर्थसंकल्पात कर्मचार्यांच्या बोनससाठी 5 कोटी 95 लाखांची केलेल्या तरतुदीप्रमाणे यंदा वाढीव बोनस देण्याची मागणी केली. त्याचा आढावा घेत आयुक्तांनी 11 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या बैठकीत जाहीर केलेल्या 24 हजार 717 रुपयांच्या बोनसमध्ये 5 टक्के म्हणजेच 1 हजार 236 रुपयांची वाढ करण्यास मान्यता दिली. यामुळे यंदाच्या दिवाळीत पालिका कर्मचार्यांना 25 हजार 953 रुपये बोनस मिळणार आहे. पालिकेतील वर्ग 1 ते 4 मधील स्थायी 1 हजार 319 अधिकारी व कर्मचार्यांसह 10 निवृत्त अधिकारी, 153 शिक्षकांना होणार आहे.