

कोपर : आरती परब
ठाण्यातील दिवा पूर्वेच्या चौकातील अनंत पार्क सोसायटीवर महापालिकेकडून तब्बल 18 वर्षांनंतर आज अतिक्रमाणाची कारवाई आली होती. पण त्या सोसायटीमधील नागरिकांच्या आणि दिव्यातील सर्व पक्ष एकत्रित येउन झालेल्या प्रचंड विरोधामुळे कारवाई थांबली. त्यानंतर अनंत पार्क सोसायटी मधील सर्व नागरिक, महिलांनी आक्रमक पवित्रा घेत हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊनच रस्त्यावर बसल्या होत्या. त्यामुळे वाहतूककोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. तर नागरिक ही जिवाची पर्वा न करता स्वतःचे घर वाचवण्यासाठी वाट्टेल ते करायला तयार झाले आहेत. त्यामुळे कोणतीही तोड कारवाई न करता पालिका अधिकार्यांना माघारी फिरावे लागले.
एका सोसायटीमधील 3 इमारतीवर आलेल्या कारवाईमुळे दिवा आज नक्कीच पेटला होता. पालिकेच्या विरोधात ही हाय हायच्या घोषणा दिल्या गेल्या. ही कारवाई 15 दिवसांपूर्वी आलेली नसून या अनंत पार्कमधील रहिवाशी, इमारत विकासक आणि इमारतीच्या जागा मालकाचा वाद कोर्टात गेल्या 4 वर्षांपासून सुरु आहे. 18 वर्षांआधी बांधलेली अनंत पार्क ही सोसायटी 3 इमारतींची आहे. तर इमारत जागा मालकाचे सोसायटीच्या तिसर्या इमारतीमध्ये 14 फ्लॅट सद्या आहेत. त्या फ्लॅटचे ते इमारत मेंटेनस आणि पाणा बील भरत नसल्याने सोसायटीच्या रहिवाशांचा जागा मालकाशी वाद होऊन ते जागेसाठी मानिव हस्तांतरण (डिम्ड कन्व्हेंस) करायला गेल्याने तो वाद चिघळला. त्यानंतर जागा मालक यांनी उच्च न्यायालयात याचीका टाकून माझ्या जागेत अनधिकृत बांधकाम झाले असून ते तोडण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर कोर्टाने ती मान्य करुन पालिकेला कारवाईचे आदेश दिले. आज अनंत पार्क या सोसायटीमधील तिनही इमारतींवर अतिक्रमणाची कारवाई आलेली होती. कोर्टाने पालिकेच्या कमिशनर यांना प्रश्न करुन ही अतिक्रमणाची कारवाई 18 वर्षे का झाली नाही. हे विचारताच पालिकेने तीन आठवड्यांची मुदत घेऊन ती कारवाई करु असे उच्च न्यायालयाला सांगितले आहे. तर गेल्या 15 दिवसांपूर्वी या अनंत पार्क सोसायटीवर अतिक्रमणाची कारवाईचे आदेश आले.आम्ही जिव देऊ पण आमचे घर तोडायला देणार नाही, या निर्णयावर आलेले आहेत. त्यावेळी नागरिकांचा संताप दिसून आला. या आजच्या कारवाईसाठी पालिकेचे 100 अधिकारी तोड कारवाईसाठी आलेले होते. तर बराच पोलीस फौज फाटा तेथे तैनात होता. अधिकार्यांना ही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. या नागरिकांचा विरोध बघता तूर्तास कारवाई थांबवून सर्व पालिका अधिकारी आज माघारी फिरले
आज नवी मुंबईत असलेल्या गणेश नाईकांच्या जनता दरबारात दिवा भाजपचे शिष्ट मंडळ तसेच ठाकरे शिवसेनेचे आणि अनंत पार्क सोसायटीचे नागरिक गेले होते. त्यावेळी अनंत पार्क बिल्डिंग तोडण्यासाठी आलेल्या अधिकार्यांना सदर कारवाई थांबवण्याचे आदेश देत नागरिकांची बाजू मांडण्यासाठी अवधी देण्यात यावा, यासाठी देखील महापालिका, महाराष्ट्र शासन आणि मा. न्यायालयाला आवाहन करणार असल्याची भूमिका मांडली. या तुमच्या लढ्यात आम्ही पूर्णपणे तुमच्या सोबत आहोत. कोणताही अन्याय होऊ देणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ असेही नाईक यांनी सांगितल्याचे दिवा भाजपा अध्यक्ष सचिन भोईर यांनी सांगितले. त्यांच्याबरोबर कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे, ठाण्याचे आमदार संजय केळकर, जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले उपस्थित होते.
नागरिक, महिला, वृध्द, लहान मुले तर दहावी बारावीचे विद्यार्थीही यावेळी विरोधासाठी रस्तावर उतरले आहेत. त्यांनी शनिवार आणि रविवार रस्त्यावर बसून निषेध नोंदवत तेथेच जेवण ही बनवले. जोपर्यंत आमच्या इमारतीवरील कारवाई रद्द होत नाही, तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही, असा काही महिलांनी आक्रमक पवित्रा घेत आहेत.
शनिवारी झालेल्या अनंत पार्कच्या नागरिकांच्या निषेध आंदोलनानंतर रविवारी सकाळी दिव्यातील नागरिकांनी ठाण्यात धाव घेऊन उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तेव्हा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली शिंदे यांच्याशी नागरिकांनी भेटून त्यांच्या अडचणी सांगितल्या. तेव्हा शिंदे यांनी यासंदर्भात आयुक्त सौरव राव यांच्याशी चर्चा करुन योग्य तो पर्याय यावर काढू, असे आश्वासन नागरिकांना दिल्याचे उपमहापौर मढवी यांनी माहिती दिली.