

डोंबिवली (ठाणे) : पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील गावकाटी येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डोंबिवलीतील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे लक्षवेधी सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रविवारी (दि.22) रोजी दिवसभर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत राहून त्यांच्या सुख-दुःखासह समस्या शेअर करत आनंद व्यक्त तर केलाच, शिवाय त्यांना सायकलींसह शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांसमवेत स्नेहभोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.
या उपक्रमासाठी ट्रस्टचे पदाधिकारी प्रशांत देसाई यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या समवेत ट्रस्टचे सदस्य प्रमोद शिंदे, विनायक पेंडणेकर, निलेश म्हात्रे, विवेक पडवळ, रामराव पवार, संतोष देसाई, अविनाश बागुल, आनंद सावंत, निलेश धुरे, चिन्मय देसाई, निलेश फाळके, समीर धुरी यांनी सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल घेत शाळेने आपुलकी ट्रस्टशी संपर्क साधला. ट्रस्टने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत २५ सायकली, तसेच वह्या, पुस्तके, दप्तर, कंपॉस सेट, आदी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना भेट दिले. या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांसमवेत स्नेहभोजनही करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास सुलभ होणार आहे. तसेच शिक्षणात अधिक उत्साह देखिल निर्माण होईल, असा विश्वास शाळा प्रशासनाने व्यक्त केला. आपुलकी ट्रस्टच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखिल ट्रस्टचे आभार मानले आहेत.
दरम्यान, आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टने यापूर्वीदेखील विविध भागात सामाजिक उपक्रम राबवले असून, गरजूंसाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या दृष्टीने मदतकार्य करण्याचा वसा सातत्याने सुरू ठेवले आहे.