भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिका हद्दीतील वरसावे उड्डाणपूल ते घोडबंदर किल्ल्यापर्यंतच्या सुमारे 2 किलोमीटरपर्यंत विस्तारलेल्या खाडी किनार्याचा विकास वॉटर फ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने या कामाच्या पहिल्या टप्प्याकरीता तब्बल 150 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
या कामाला पुढील महिन्यापासून सुरुवात होणार असून आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 2 किलोमीटरपर्यंत लांब वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट म्हणजेच खाडी किनार्याचा सुनियोजित पद्धतीने विकास केला जाणार आहे. पालिकेकडून या कामाचे डिझाईन, संकल्पचित्र तयार करण्यात आले होते. त्यानुसार मिरा-भाईंदर शहराला लाभलेल्या या खाडी किनार्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंट करण्याची मागणी सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती.
पालिका हद्दीतील वरसावे ब्रिज ते घोडबंदर किल्ल्यादरम्यान सुमारे 1.8 किमी पर्यत खाडी किनारा आहे. परदेशात जसे वॉटर फ्रंट डेव्हल्पमेंटच्या माध्यमातून तेथील परिसर सुशोभित केला जातो. त्या धर्तीवर येथील खाडी किनारा विकसित करण्यात येणार आहे. याचप्रमाणे गुजरात राज्यात देखील साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट संकल्पना राबविण्यात आली आहे. त्याप्रमाणे घोडबंदर खाडी किनार्याच्या विकासाची संकल्पना राबविण्यात येणार आहे.
या कामातील पहिल्या टप्प्याचा खर्च 150 कोटी इतका असून त्याला राज्य सरकारने मंजुरी देण्यात आली आहे. तर मंजूर खर्चातून 121 कोटी खर्चाची निविदा प्रक्रिया पालिकेकडून राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यातील कामासाठी पर्यावरण विभागाच्या महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटीकडून 23 सप्टेंबर रोजी पालिकेला सीआरझेड परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कामाचा मार्ग मोकळा झाला असून हे काम पुढील 2 वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे त्यांनी म्हटले.
वरसावे ते घोडबंदर खाडी किनार्याला पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा आराखडा पालिकेकडून तयार करण्यात आला असून त्यात पर्यटकांना चालण्या-फिरण्यासाठी प्रशस्त पाथ वे, विविध प्रकारचे आकर्षक गार्डन्स, विसर्जन घाट, लहान मुलांना खेळण्यासाठी जागा, बसण्यासाठी विविध तसेच आकर्षक पद्धतीची आसन व्यवस्था केली जाणार आहे. याखेरीज मिया वाकी धर्तीवर दाट झाडांचे उद्यान साकारण्यात येणार असून हिरवेगार लॉनसह पार्किंग सुविधा, व्हॉली बॉल तसेच फुटबॉल खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई, सुसज्ज जेटी, दशक्रिया घाट अशी विविध कामे देखील केली जाणार आहेत. या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू असून या खाडी किनार्यावर जेथे कांदळवन आहे. तेथे लाकडाचे म्हणजेच इको फ्रेंडली साहित्य वापरण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या खाडी किनार्यावर जेथे घाट बांधले जाणार आहेत त्याखेरीज इतर ठिकाणी लोकांचा थेट पाण्याशी संपर्क होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. यामुळे हे ठिकाण केवळ मिरा-भाईंदरच नव्हे तर मुंबई, ठाणे, वसई-विरारमधील लोकांसाठी महत्वाचे पर्यटन केंद्र बनेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला.