Thane | छत्रपती शिवाजी महाराज चौकाला ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करा
डोंबिवली : यापूर्वी घर्डा सर्कल परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान पडलेले असायचे. या चौकाचे सुशोभीकरण करून त्याजागी उभारण्यात आलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण शिवजयंती दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. आता याच चौकाचे पावित्र्य राखण्यासाठी, तसेच या चौकाचे विद्रुपीकरण होऊ नये यासाठी परिसराला ना फेरीवाला क्षेत्र जाहीर करावे, या मागणीकडे सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनने शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
चौकाजवळ असलेल्या टपऱ्या आणि ठेले आजदे गावात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला ठेवले आहेत. शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी चौकात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ही रोषणाई काढता क्षणी याच टपऱ्या आणि ठेले पूर्ववत जागी ठेवल्या जातील. परिणामी चौकाचे विद्रुपीकरण होणार यात शंका नाही. या संर्भात सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विशाल शेटे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपअभियंता राज कांबळे यांच्यासह कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक फेरीवाले अनधिकृतपणे आपले बस्तान मांडून बसलेले असायचे. पण आता या चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक तयार करण्यात आले असून त्याचे पावित्र्य सर्वांनी जपणे अपेक्षित आहे. त्यासाठी या चौक परिसराला ना फेरीवाले क्षेत्र घोषित करून तसे फलक लावण्यात यावे. तसेच चौकाच्या 100 मिटर परिघात कुणीही अतिक्रमण करणार नाही, याची एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासनाने दक्षता घ्यावी, अशीही मागणी सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेटे यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
पूर्वीपेक्षा या चौकाचा परीघ आता वाढला असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यातच चौकाच्या परिसरात अतिक्रमणे आणि फेरीवाल्यांचा वावर वाढल्यास चौकाचे विद्रुपीकरण होईल, शिवाय एकीकडे स्मारकाच्या पावित्र्याचा, तर दुसरीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे चौकाच्या परिसरात फेरीवाले व खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी त्यांचे बस्तान मांडू नये, याची एमआयडीसी आणि केडीएमसी प्रशासनाने दक्षता घ्यावी, याकडे असोसिएशनचे अध्यक्ष विशाल शेटे यांनी दोन्ही प्रशासनांचे लक्ष वेधले आहे. आता केडीएमसी आणि एमआयडीसी प्रशासन यावर काय कार्यवाही करते, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

