Thane | शॉर्ट सर्किट झाल्याने एकट्याच राहत असलेल्या वृद्धेचा मृत्यू
डोंबिवली : डोंबिवली पूर्वेकडील सावरकर रोड परिसरातील एका घरात शनिवारी (दि.9) सकाळच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट होऊन एका 79 वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमृता प्रमोद मोतीवाल (79) असे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे.
डोंबिवली अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार पूर्वेतील सावरकर रोड परिसरातील लक्ष्मी निवास सोसायटीच्या तळमजल्यावर एका घराला आग लागली. ही माहिती कळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक रहिवाशांनी तत्पूर्वीच आग आटोक्यात आणली होती. अमृता या एकट्याच राहत असाव्यात. घरात सकाळी शॉर्ट सर्किट होऊन ऑक्सिजन मशीनचा शॉक बसून त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तविला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वृद्धेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलकडे पाठवून दिला. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक शहाजी नरळे यांनी दिली.

