

कसारा : गावात ना रस्ता ना वीज दहा किलोमीटर पायी प्रवास असा मुख्य प्रवाहापासून दूर असलेला दापूरमाळ गाव अनेक समस्यांशी सामना करत आहे. या डोंगर दर्यांमध्ये लपलेल्या गावांना भेट दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या गावाला मुख्य प्रवाहात आणा, विविध योजनांचा लाभ द्या, अशा सूचनाही त्यांनी विविध विभागाच्या अधिकार्यांना दिल्या.
स्वातंत्र्याच्या पंचांहत्तरीनंतर देखील या गावात रस्ता, वीज, नसल्याने शहापूर तालुक्यातील दापूर मात्त्च्या ग्रामस्थांना 7 ते 10 किलोमीटर पायी प्रवास करून मुख्य रस्त्याला यावे लागते व मुख्य रस्त्यावर आल्यानंतर त्या ठिकाणाहून इच्छित स्थळी बाजार हाट असो किंवा रुग्णालयात जाणे असो, असा प्रवास करावा लागतो; परंतु या पायी प्रवासात देखील या दापूर माळ वासियांना डोंगर दरी, नाले तुडवत प्रवास करावा लागतो.
गावात एखादी व्यक्ती आजारी पडलेली असल्यास किंवा एखाद्या गरोदर मातेला रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आल्यास त्यांना झोळी करून घेऊन जाण्याची वेळ या लोकांवर येते. रस्ताच नसल्याने दापूर माळ या गावासाह शहापूर तालुक्यातील 68 गावांचा विकास झालेला नाही. त्यात दापूर माळची अवस्था तर भयाण आहे.
रस्ता, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत सुविधांचा अभाव या गावात पाहायला मिळतो याबाबत बातम्या प्रसिद्ध केल्या. याची दखल बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी घेत पायी प्रवास करीत आज दापूर माळ गाठत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.
दुर्गम भागांतील शेवटच्या माणसापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा निर्धार आहे, असे घुगे यांनी सांगितले. त्यांच्या या पायी भेटीमुळे प्रशासनाकडून गावाच्या विकासासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. दापूर माळ सारख्या गावांमध्ये जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकार्यांची थेट भेट ही अत्यंत दुर्मीळ गोष्ट मानली जाते. त्यामुळे या भेटीने गावात ग्रामस्थांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.