

सापाड : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात धोकादायक इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते, तरीही प्रशासनाकडून फारशी ठोस कार्यवाही होत नसल्याने हजारो रहिवासी अजूनही अशा इमारतींमध्ये जीव मुठीत घेऊन राहत आहेत.
धोकादायक इमारतींचा प्रश्न केवळ तांत्रिक नसून सामाजिक आणि प्रशासनिक जबाबदारीचा भाग आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यातील दुर्घटना टाळता येणार नाहीत अशी शक्यता अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे. महापालिकेने तातडीने हालचाल करून या इमारतींतील रहिवाशांचे संरक्षण सुनिश्चित करणे गरज जोर धरू लागली आहे.
नुकत्याच कल्याण पूर्व भागात घडलेल्या धोकादायक इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले होते. या दुर्घटनेत अनेक जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. तरीदेखील कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन अजूनही धोकादायक इमारतींकडे गंभीरतेने पाहत नसल्याचे चित्र दिसून येते.
या दुर्घटनेनंतरही महापालिकेने इतर धोकादायक इमारतींबाबत कोणतीही तातडीची कारवाई केली नसल्याने, शहरातील शेकडो रहिवासी अजूनही अशाच मृत्यूच्या सावलीत जगत आहेत.