कसारा : मुंबई-नाशिक महामार्गावर धोकादायक होर्डिंग असून यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. यापूर्वी मुंबईत होर्डिंग कोसळल्याने काही जणांना आपला जीव गमवावा लागला होता; मात्र अशा दुर्घटनानंतरही मोठ्या होर्डिंगवर कारवाई होत नाही. मुंबई नाशिक महामार्ग परिसरात जवळपास 150 हून अधिक बेकायदा मोठे होर्डिंग आहेत.
भिंवडी ते कसारा घाट दरम्यान हॉटेल व्यवसायकांनी चक्क एलईडी स्क्रीन लावले आहेत. शाळा, कॉलेज, स्टेशन परिसरात उभारलेले होर्डिंग कोसळल्यास अपघाताची भीती आहे; मात्र अशा दुर्घटना घडू नयेत, यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत.
कसारा घाटाखाली हॉटेल कसारा गेट,हॉटेल स्टार हायवे या ठिकाणासह ओहळाची वाडी रोडवर यापूर्वीही होर्डिंग्ज कोसळून अपघात घडले आहेत, त्यात सुदैवाने नागरिक जखमी झाले नसले तरी वाहनांचे नुकसान झाले आहे.
कसारा घाट परिसरात लतीफवाडी ग्रामपंचायत प्रशासन, तर उंबरमाळी जवळील हॉटेल व्यवसायिकाच्या होर्डिंग, बेकायदेशीर सिमेंट प्लांटच्या लोखंडी स्ट्रक्चरसाठी शिरोळ ग्रामपंचायत कारणीभूत असून या दोन्ही ग्रामपंचायतीने जनहिताचा विचार न करता होर्डिंग लावणार्या कंपनीला व बेकायदेशीर प्लांट उभा करणार्या कंपन्यांना परवानगी दिल्याने महामार्गावर धोकादायक स्थिती निर्माण झाली असून प्रवासी वाहन चालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
या भागात पडणारा पाऊस वादळ वार्यासह येत असल्याने परिसरात झाडे पडणे, बॅनर, होर्डिंग कोसळणे अशा घटना घडतात. दरम्यान एकीकडे खड्ड्यांमुळे वैतागलेले वाहतूकदार, वाहन चालक, प्रवासी आता ह्या महाकाय होर्डिंग्समुळे धास्तावले आहेत.