

ठाणे : सलग दोन दिवस अक्षरशः थैमान घातलेल्या पावसाने बुधवारी दुपारनंतर काही प्रमाणात उसंत घेतल्याचे पाहायला मिळाले. मात्र गेल्या 24 तासांत ठाणे जिल्ह्यात 175 मि.मी पावसाची नोंद झाली असून यामध्ये सर्वाधिक 196.9 मि.मी पावसाची नोंद ही ठाणे शहरात झाली आहे. जिल्ह्यातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने पुराचा फटका नागरिकांना बसू नये यासाठी स्थानिक प्रशासनाकडून 610 नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तर बारवी, तानसा, मोडकसागर, भातसा आणि मध्य वैतरणा या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असल्याने शेजारील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात होती. परंतु दुपारी 12 नंतर पावसाने उसंत घेतली. असे असले तरी देखील जिल्हा प्रशासन आणि स्थानिक पालिका प्रशासन अलर्ट मोडवर होते. मागील 24 तासात झालेल्या पावसामुळे ठाणे तालुक्यातील मौजे. तुर्भे येथील इव्हीएम वेअर हाऊसच्या परिसरात पाणी साचल्याने नवी मुंबई महानगरपालिका मार्फत पंप लावून पाण्याचा उपसा करणे आला. तर, कल्याण तालुक्यातील काटई येथे 11 गाळे व 10 घरांमध्ये पावसाचे पाणी जाऊन अशंत: नुकसान झालेले आहे. तसेच मौजे. नांदिवली येथे साई कमल सोसा. मध्ये तळ मजला 16 रूम पाण्याखाली गेले होते.
काटेमानिवली येथे शिवाजी नगर, वालधुनी येथे अंदाजित 12 ते 13 घरांमध्ये तसेच वृंदावन शिवकृपा चाळ, महालक्ष्मी शॉपी, 7 ते 8 घरांमध्ये पाणी शिरले होते. तर, मौजे, भोपर येथे नाल्याचे पाणी चाळीमध्ये जाऊन 10 घरांचे नुकसान झाले. दरम्यान, जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मंगळवारी जिल्ह्यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. तर, घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.
कल्याण तालुक्यातील चिकणघर वालधुनी नदी किनारी अशोक नगरमध्ये 6 घरात पाणी शिरले असून सदर नागरिक त्यांचे नातेवाईकांच्या घरी गेले आहेत. कल्याण तालुक्यातील समता नगर अहिरे गावातील घरे पाण्याखाली गेली असल्याने 70 नागरिकांना महानगरपालिकाच्या शाळेत व्यवस्था करण्यात आली आहे. कल्याण तालुक्यातील काटेमानीवली वृंदावन शिवकृपा चाळ पाण्याखाली गेली असल्याने 10 नागरिकांना जागधारा शालेत स्थलांतरीत केले आहेत.
उल्हासनगर तालुक्यातील मौजे. भरत नगर कानसई रोड, उल्हासनगर येथे सर्व घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे 183 नागरिकांना समाज मंदिर व 223 नागरिकांना तक्षशीला शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते. परंतु पाण्याची पातळी कमी झाल्यमुळे सदरचे नागरिक आपआपले घरी परत गेले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
ठाण्यात तिसर्या दिवशीही पडझड सुरूच
बुधवारी सलग तिसर्या दिवशी ठाण्यात पावसाची रीपरीप सुरूच होती. बुधवारी दुपार पर्यंत शहरातील काही सखल भागात पाणी साचले होते. झाडे कोसळणे आणि सुरक्षा भिंती धोकादायक होणे असे प्रकार सुरूच असल्याचे दिसून आले. बुधवारी पहाटेच वागळे इस्टेटमधील लाभेश सोसायटीत मोठे झाड कोसळून सोसायटीची सुरक्षा भिंत अक्षरश: ढासळण्याच्या स्थितीत आली. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने कारवाई करून झाड कापले आणि 30 फूट लांबीची, 8 फूट उंचीची भिंत पाडून टाकली.
वसंत विहार परिसरात केतकी सोसायटीजवळही सकाळी आणखी एक झाड कोसळून चारचाकी वाहनाखाली गाडले गेले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ब्रम्हाड भागातही झाडाची फांदी पडली. पातलीपाडा परिसरात झाडाची फांदी कोसळून अपघात घडला. माजिवडा शांती सदन सोसायटीच्या बाजुला पाणी साचले होते, पोलीस स्कुलच्या समोर, दिवा स्टेशनजवळील आर.के. बाजार आदी भागात पाणी साचल्याच्या घटना घडल्या.
ठाण्यात 24 तासांत 45 वृक्ष उन्मळून पडले
ठाणे शहरात गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून यामध्ये सर्वाधीक नुकसान हे वृक्षांचे झाले आहे. गेल्या 24 तासांत शहरात विविध ठिकाणी तब्बल 45 पेक्षा अधिक वृक्ष उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या फांद्या छाटणीच्या मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
बारावी, तानसा धरण 100 टक्के भरले
धरण क्षेत्रातही चांगला पाऊस पडल्याने जिल्ह्यातील बारावी आणि तानसा धरण हे 100 टक्के भरली आहेत. त्यामुळे ठाणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तर भातसा धरण 93.13% भरलेले असून या धरणाचे 5 गेट व पॉवर आउटलेट 2 गेट उघडण्यात आले आहेत. दुसरीकडे मोडक सागर धरण 94.12% भरलेले आहे अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.