

डोंबिवली : डोंबिवलीतील महारेरा नोंदणी घोटाळ्यातील बेकायदा 65 बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच दुसरीकडे याच 65 बांधकामांपैकी आयरे गावातील साई गॅलेक्सीच्या बिल्डरांवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पोलिसांना दिले आहेत.
आयरे गावातील बालाजी गार्डन गृहसंकुलाच्या बाजूला असलेल्या साई गॅलेक्सी या 65 महारेरा बेकायदा इमारत प्रकरणात मे. साई डेव्हलपर्सचे भागीदार शालीक आर. भगत यांनी बनावट सातबारा उतारा आणि बिनशेती परवान्याचा वापर करून सह दुय्यम निबंधक कल्याण 1 कार्यालयातून खरेदीखत दस्त नोंदणी करून घेतल्याचा अहवाल मंडळ अधिकारी रविंद्र जमदरे यांनी दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे.
साई गॅलेक्सी ही बहुमजली इमारत उभारणारे बिल्डर शालीक भगत यांनी एकीकडे शासनाची दिशाभूल तर केलीच, शिवाय दुसरीकडे फसवणूक केल्याचेही उघडकीस आल्याने त्यांच्यावर भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार सचिन शेजाळ यांनी रामनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांना दिले आहेत. शालीक भगत यांनी महारेराच्या बनावट परवानगीच्या आधारावर कोपर पूर्वेकडे रेल्वे स्टेशनजवळ 160 सदनिकांच्या सात मजली इमारती उभारल्या आहेत.
जमिनीच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून डोंबिवलीत बेकायदा इमारती उभारणाऱ्या बिल्डरांना महसूल विभागाने हा पहिलाच दणका दिला आहे. डोंबिवलीतील 65 बेकायदा इमारतींची बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या बिल्डर, दलाल, दस्त नोंदणी दलाल, आदी मंडळी या बेकायदा बांधकामांना जबाबदार असल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, महसूल विभाग, दस्त नोंदणी शाखा, शासकीय अधिकारी, या साऱ्यांवर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांताधिकारी विश्वास गुजर आणि तहसीलदार सचिन शेजाळ यांच्याकडे केली आहे.
मंडळ अधिकारी रविंद्र जमदरे यांच्या अहवालानुसार तहसीलदार शेजाळ यांना आयऱ्यातील साई डेव्हलपर्सचे भागीदार शालीक भगत यांनी खरेदी खतासाठी वसंत गौतम व इतरांच्या नावे असलेल्या भूधारणा वर्ग - 2 या कुळ कायद्याने प्राप्त जमीन सात/बारा उताऱ्याचा (स. क्र. 29-5-अ, क्षेत्र 15 गुंठे) नियमबाह्य वापर केल्याचे आढळले. या सात/बारा उतारा, बनावट बिनशेती परवाना आदेशद्वारे भगत यांनी खरेदीखत करून शासनाची फसवणूक केल्याचे मंडळ अधिकारी रविंद्र जमदरे यांनी केलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले
मे. साई डेव्हलपर्सचे भागीदार शालिक भगत यांनी गुन्हेगारी स्वरूपाचे कटकारस्थान करून आयरे गावातील सर्व्हे क्र. 29-5-अ या 15 गुंठे क्षेत्राचे सह दुय्यम निबंधक कल्याण 1 कार्यालयात 8 आक्टोबर 2020 रोजी 5969-2020 या दस्त नोंदणीचे खरेदी खत तयार केले. अशा पद्धतीने महसूल विभागाची दिशाभूल केल्याचा ठपका बिल्डर शालिक भगत यांच्यावर ठेवून तहसीलदार शेजाळ यांनी अशा स्वरूपाच्या गुन्हेगारांवर जरब बसावी यासाठी कायदेशीर कारवाईचे पोलिसांना आदेश दिले आहेत.
डोंबिवलीतील 65 महारेरा बेकायदा इमारत प्रकरणात मे. साई डेव्हलपर्सचे भागीदार शालिक भगत यांंनी बनावट बिनशेती परवाना आणि सात/बारा उताऱ्याद्वारे दस्त नोंदणीकृत खरेदी खत केले आहे. शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केल्याने भगत यांच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना पत्राद्वारे दिल्या आहेत. शिवाय इतर बेकायदा इमारतींच्या कागदपत्रांची देखिल अशाच पद्धतीने चौकस तपासणी करण्यात येत असल्याचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी सांगितले.