

डोंबिवली : टोरेस घोटाळ्याचे पडसाद अजूनही उमटत असतानाच अशाच एका फसवणूककांडाची पुनरावृत्ती डोंबिवलीत उघडकीस आली आहे.
शेअर मार्केटमध्ये गलेलठ्ठ परताव्याचे आमिष दाखवून ग्रोथअप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंगच्या नावाखाली तब्बल 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक करण्यात आल्याचे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून चव्हाट्यावर आले आहे. या फसवणूककांडाची पोलिसांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
अनिकेत मुजुमदार, संदेश जोशी आणि संकेत जोशी असे या फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींची नावे आहेत. ग्रोथअप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सल्टिंग या क्लासेसच्या माध्यमातून आधी विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे क्लासेस घेतले जायचे. त्यानंतर या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन करून त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडले जायचे. केलेल्या गुंतवणुकीवर दरमहा 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करायचा फंडा अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाने अवलंबिला होता. या संदर्भात डोंबिवलीच्या रामनगर पोलिसानी 8 ते 9 जणांनी दिलेल्या फिर्यादीवरून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केल्यानंतर दोन आरोपींना ताब्यात घेतले. अन्य एकजण फरार असून पोलिस त्याचाही कसोशीने शोध घेत आहेत.
पोलिसांच्या मते फसवणूककांडात अडकून गुंतवणूक केलेल्या रकमेचा आकडा फुगण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी अशा प्रकारे शेअर मार्केटिंग, डिजिटल अरेस्ट, तसेच जास्त पैसे देण्याच्या अमिषाला बळी पडू नये. अशा पद्धतीने कुणी गुंतवणुकीच्या माध्यमातून फसवणूक करत असल्याचे कळताच त्याची माहिती तात्काळ द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.