

डोंबिवली : धावत्या मेल व एक्सप्रेसमध्ये झोपलेल्या महिला प्रवाशांच्या उशाखालील लेडीज पर्स लंपास लांबविणार्या सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग क्राईम ब्रँचने मोठ्या कौशल्याने चतुर्भुज केले. या चोरट्याला बदलापूरमध्ये सापळा रचून जेरबंद करण्यात आहे. विशेष म्हणजे महागडे शौक आणि मौजमज्जा करण्यासाठी चोरीचे दागिने विकून हा बदमाश चोर्या करत असल्याचे तपासात समोर आले आहे. सहिमत अंजूर शेख (29) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे
लोहमार्ग क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार 22 मार्च रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एक महिला मँगलोर रेल्वे स्टेशन येथून निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करत होत्या. ही एक्स्प्रेस 23 मार्च रोजी डोंबिवली जवळचे कोपर स्टेशन ओलांडत होती. याच दरम्यान प्रवासी महिलेच्या उशाखालील पर्स चोरी झाल्याबाबत दिलेल्या तक्रारीवरुन डोबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 305 (सी) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता.
या गुन्हाचा तपास सुरू असतानाच अशा पद्धतीने रात्रीच्या वेळी मेल व एक्सप्रेसमध्ये बॅग उचलून चोरीच्या बर्याच गुन्ह्यांची कार्यप्रणाली एक सारखीच असल्याचे निदर्शनास आल्याने वरीष्ठांनी अशा गुन्ह्यांना पायबंद घालून दाखल गुन्हे उघडकिस आणण्याच्या दृष्टीने आवश्यक सूचना व मार्गदर्शन केले. त्यास अनुसरून कल्याण लोहमार्ग क्राईम ब्रँचने तपास चक्रांना वेग दिला. बहुतेक गुन्हे हे रात्रीच्या सुमारास घडलेले असल्याने रात्रीच्या वेळी मेल व एक्स्प्रेसमध्ये साध्या गणवेशात सापळे लावून, तसेच गस्त करून आरोपीतचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू होते.
दरम्यान माहिती मिळताच लोहमार्ग क्राईम ब्रँचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहिमत शेख याला बदलापूरच्या शहर हद्दीतून सापळा रचून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता सहिमत शेख याने निजामुद्दीन मंगला एक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेची दागिन्यांची पर्स लांबविल्याची कबूली दिली. लोहमार्ग न्यायालयात हजर केले आहे न्यायालयाने अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.