

भाईंदर : वसई-विरार महापालिकेतील एका वरीष्ठ अधिकार्याच्या फोटोतील चेहरा 18 नोव्हेंबर 2024 ते 8 डिसेंबर 2024 एका वेब साईटवरील स्त्री, पुरुषाच्या फोटोवर स्त्रीच्या जागी चिटकवुन (मॉर्फ) करून तो फोटो संबंधित आधिकार्यांची बदनामी करण्याचे उद्देशाने समाज माध्यमांवर प्रसारीत केला. तसेच संबंधीत आधिकारी व त्यांचे परिवारातील सदस्यांची सुद्धा बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात एका अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा 3 च्या पथकाने कसून शोध घेत त्याला शुक्रवारी बेड्या ठोकल्या.
आरोपीचे नाव चंदन सूर्यभान सिंह उर्फ चंदन ठाकूर (32) असे असून तो विरार पश्चिमेकडील 57/504, जे एव्हेन्यू इमारतीत राहणारा आहे. हा आरोपी अनधिकृत बांधकामे शोधून बांधकाम करणार्यांकडून मोठी खंडणी उकळत असे. तसेच त्याच्याशी संबंधित असलेल्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेने तोडक कारवाई केल्यास संबंधित अधिकार्यासह त्याच्या परिवारातील सदस्यांचे अश्लील मेसेज समाजमाध्यमांवर वेगळ्या मोबाईल क्रमांक तसेच बनावट मेल आयडीद्वारे प्रसारीत करीत असे. त्यात मिरा-भाईंदर महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांपासून प्रभाग अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांचा समावेश असून पालिकेच्या कारवाईचे वृत्त प्रसिद्ध करणार्या पत्रकारांचे बदनामीकारक मेसेज सुद्धा तो प्रसारीत करीत असे. उत्तनमध्ये तर त्याने धुमाकूळ घातला होता. यासाठी त्याला काही अधिकार्यांचेच पाठबळ मिळत असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने त्याला मिरा-भाईंदरमधून तडीपार केला होता. तो एका स्थानिक राजकीय नेत्याचा हस्तक मानला जात असून त्याच्याच आश्रयाखाली तो आक्षेपार्ह उपद्व्याप करीत असल्याचे बोलले जात आहे. अखेर वसई-विरार महापालिकेतील एका वरीष्ठ अधिकार्याची आरोपीने बदनामी केल्यानंतर त्याला गुन्हे शाखा 3 च्या पथकाने शुक्रवारी (दि.21) विरार येथून बेड्या ठोकल्या. यापूर्वी त्याच्यावर एकूण 15 गुन्हे विविध कलमान्वये दाखल आहेत. तर पिडीत पत्रकारांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला असून त्यावर अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही.आरोपी सध्या बोळींज पोलीस ठाण्याच्या लॉकअपमध्ये असून घटनेचा तपास पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत करीत आहेत.