

मुरबाड : डॉक्टरी व्यवसायातून दोन डॉक्टरांमध्ये झालेल्या वादातून एका डॉक्टरने कट रचून साथीदारांच्या मदतीने दुसर्या डॉक्टरांच्या कारवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. ही घटना मुरबाड-सरळगाव येथील श्रीकृष्ण हॉस्पीटलसमोर रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे गोळीबार करणार्या अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला असता, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे 26 दिवसांनी चार आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. मात्र, मुख्य आरोपी डॉक्टरसह दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉ.रवीशंकर पाल यांचा मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरळगाव येथे श्रीकृष्ण हॉस्पीटल आहे. तर याच परिसरात मुख्य आरोपी डॉ.रामचंद्र भोईर यांचेही हॉस्पिटल असून या भागात डॉ. पाल यांच्याकडे येणार्या रुणांची संख्या अधिक असल्याने आरोपी डॉ. भोईर यांच्याकडे रुग्ण कमी जात होते. यातूनच वाद होऊन डॉ. पालकडे असलेल्या आरोपी गौरव तुंगार या कंपाउंडरशी आणि आरोपी लॅब चालक साबळे, या दोघाशी संगणमत करून डॉ. पालच्या व्यवसायवर परिणाम होईल, असा कट रचला होता.याप्रमाणे अटक आरोपी ओखोरे आणि पवार या दोघांना गोळीबार करण्यासाठी सांगण्यात आले. त्यासाठी अटक आरोपी गौरव याने एक गावठी कट्टा (बंदूक) फरार आरोपी वाघ यांच्याकडून आणून गोळीबार करणार्या दोघांना दिला. त्यातच डॉ. पाल हे श्रीकृष्ण हॉस्पीटलसमोर रस्त्यावर कार पार्किंग करून गेले असता, दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञात आरोपींनी कारवर गोळीबार करून पळून गेले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी कारवर गोळीबार झाल्याची घटना समोर आल्यानंतर डॉ. पाल यांनी 4 जुलै रोजी मुरबाड पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता घटनास्थळाच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 1 जुलै रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास दुचाकीवरूनआलेल्या दोघा अज्ञात आरोपींनी गोळीबार केल्याचे दिसून आले. अटक आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले अग्नीशस्त्र एक गावठी कट्टा (बंदूक) व एक मोटरसायकल जप्त केली आहे. गुन्ह्यातील 4 आरोपीना 26 जुलै रोजी अटक केली असून आज न्यायालयात हजर केले असता, दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी दिली आहे.
सुरेश पुंडलिक ओखोरे, (वय 32), भूषण ऊर्फ बबल्या पुंडलिक पवार, ( वय 23) दोघेही (रा.किन्हवली, ता.शहापूर) गौरव रामचंद्र तुंगार, (22 ), ज्ञानेश्वर ऊर्फ बाळा जयवंत साबळे, (रा.सरळगांव) असे अटक चार आरोपींची नावे आहेत. तर मुख्य आरोपी डॉ.रामचंद्र भोईर (रा.सरळगांव) यांच्यासह विजय वाघ, (रा.फर्डे धसई, ता.शहापूर) हे दोघेही फरार आहेत.
गुप्त बातमीदार यांचेकडून माहिती काढली असता सदरचा गुन्हा अटक आरोपी सुरेश पुंडलिक ओखोरे, भूषण ऊर्फ बबल्या पुंडलिक पवार, यांनी केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना मोठ्या शिताफीने पकडून चौकशी केली असता सदरचा गुन्हा अटक कंपाउंडर गौरव तुंगार आणि लॅब चालक ज्ञानेश्वर ऊर्फ बाळा जयवंत साबळे यांच्या सांगण्यावरून केल्याचे कबूल केले.