डोंबिवली : कल्याणच्या आधारवाडी तुरुंगामध्ये एका कैद्याने भांडणात मध्यस्थी करणार्या कैद्यावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली आहे.
ही घटना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीतून उघडकीस आली आहे. दोघांच्या भांडणात मांडवली करणे एका कैद्याला यावेळी महागात पडले. दोघा कैद्यांमध्ये झालेल्या वादामध्ये अन्य एका कैद्याने मध्यस्थी केली. या रागातून एका कैद्याने मध्यस्थी करणार्या कैद्यावरच धारदार ब्लेडने हल्ला करून त्याला जखमी केले. गुरुवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तुरुंंगात खळबळ माजली होती.
युवराज नवनाथ पवार उर्फ लोहार (30) असे हल्लेखोर माथेफिरू कैद्याचे नाव आहे. सद्या आधारवाडी तुरुंंगात शिक्षा भोगत आहे. महिला तुरुंग अधिकारी शोभा मधुकर बाविस्कर (38) यांनी या प्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 118 (1) अन्वये हल्लेखोर कैदी युवराज पवार ऊ र्फ लोहार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आधारवाडी तुरुंगातील सर्कल क्र. 5 समोर युवराज पवार उर्फ लोहार व रोशन घोरपडे या दोन कैद्यांमध्ये काही दिवसांपूर्वी वादावादी व हाणामारी झाली होती. या वादात अरविंद उर्फ मारी रवींद्र राम या कैद्याने मध्यस्थी करून दोघांतील वाद मिटवला. तेव्हापासून युवराजच्या मनात अरविंदविषयी राग होता. गुरुवारी दुपारी 3.55च्या सुमारास हा वाद उफाळून आला. तुरुंगातील सर्कल क्र. 5 च्या गेटसमोर युवराज आणि अरविंद आमनेसामने आल्यावर युवराज याने जुन्या भांडणाचा वचपा काढला. दात घासायच्या ब्रशमध्ये खोचलेल्या धारदार ब्लेडच्या साह्याने युवराज याने अरविंदच्या डोके, कान आणि चेहर्यावर सपासप वार केले. या हल्ल्यात अरविंद रक्तबंबाळ होऊन जखमी झाला. हे कळताच तत्काळ तुरुंग कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्लेखोर युवराजच्या तावडीत सापडलेल्या अरविंदला दूर केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
या हल्ल्यातून बचावलेल्या अरविंद उर्फ मारी याला हॉस्पिटलकडे हलविण्यात आले. तर दुसरीकडे तुरुंगात बेशिस्त वर्तन करून कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणणार्या हल्लेखोर युवराज पवार उर्फ लोहार याच्या विरुद्ध तुरुंगाधिकार्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी फौजदार ए. एस. लांडगे अधिक तपास करत आहेत.
तुरुंगात कैदी ठेवण्याची क्षमता 540 इतकी असताना आजमितीला तुरुंगात जवळपास 1400 कैदी आहेत. क्षमतेपेक्षाही तिप्पट कैदी दाटीवाटीने कोंबण्यात आले आहेत. झोपण्यासाठीही जागा नसल्यामुळे कैद्यांमध्ये वाद होत असतात. घुसमट होत असल्याने या कैद्यांत वाद होतात आणि असे प्रसंग घडताना दिसून येतात. तुरुंंग ओव्हरलोड झाल्यामुळे नव्याने येणार्या कैद्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात पाठवले जाते. त्याचबरोबर तुरुंंगाची दुरुस्ती व विस्तारीकरणाचा प्रस्तावही लालफितीत अडकल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.