

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील टिटवाळा पूर्व भागात एका नराधमाने 14 वर्षीय शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या विकृत कृत्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, टिटवाळा पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून या मुलीचा शाळेत येण्या-जाण्याच्या मार्गावर पाठलाग करत होता. मात्र पीडितेने याकडे वारंवार दुर्लक्ष करूनही या नराधमाची मजल वाढली होती. गुरुवारी रात्री 11 च्या सुमारास पीडिता ही आपल्या लहान बहिणीसह घराजवळ कचरा टाकण्यासाठी गेली असताना, दबा धरून बसलेल्या आरोपीने संधी साधली.
पीडितेने या कृत्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, नराधमाने तिला धमकावले. “जर ही गोष्ट कोणाला सांगितली तर तुझ्या घरच्यांना जिवंत सोडणार नाही,” अशाप्रकारची धमकी त्याने या मुलीला दिली. मात्र, या दहशतीला न जुमानता पीडितेने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली आणि घर गाठून पालकांना घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणी आरोपीवर पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.