

मिरा रोड : काशीमिरा पोलीस ठाणे हद्दीत एका सलून चालकाने वृद्ध इसमाच्या गळ्यातील सोन्याच्या चैनीच्या लालसेपोटी खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गटारात टाकल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोपी सलून चालकाला अटक केली आहे.
मिरा रोड येथील गौरव गैलेक्सी फेज- 1, विजय पार्क येथे राहणारे विठ्ठल बाबुराव तांबे ( 75 ) हे 16 सप्टेंबर रोजी मिसिंग झाल्याबाबत काशिमीरा पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार नोंद आहे. याचा तपास पोहवा दिनेश भोर यांच्याकडे तपास देण्यात आला होता. या मिसिंग व्यक्तीची आजुबाजुचे पोलीस ठाण्यांना व इतर ठिकाणी कळवण्यात आली होती. या व्यक्तीचा शोध घेत असताना त्यांच्या घरापासून आजुबाजुच्या परिसरामधील अनेक सी.सी.टी.व्ही. कॅमेर्याचे फुटेज तपासले असता 16 सप्टेंबर रोजी 2 च्या सुमारास सरस्वती बिल्डींग, एम.आय.डी.सी. रोड, काशीमीरा या इमारतीमधील सागर सलून शॉप नं.8 या दुकानामध्ये हरवलेली व्यक्ती विठ्ठल तांबे हे प्रवेश करताना दिसून आले.
त्यानंतर 17 सप्टेंबर रोजी रात्री 2.59 वा. एक इसम एका इसमाला सागर सलून, शॉप नं.8, सरस्वती बिल्डींग, एमआयडीसी रोड, काशीमिरा या दुकानातून बाहेर हाताने ओढत, फरफटत फुटपाथवरुन नेताना दिसून आला. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे 18 सप्टेंबर रोजी दुपारी 4 च्या सुमारास सलून चालकावर संशय बळावल्याने त्याच्याकडे विचारपुस करत त्याला ताब्यात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले, एक वृध्द व्यक्ती सलूनमध्ये टॉयलेट कुठे आहे? असे विचारत शॉपमध्ये आला व बराच वेळ तेथे बसुन होता, त्याच्या गळ्यात असलेली सोन्याची चैन पाहून त्याला दुकानात बसण्यास सांगितले.
थोड्या वेळानंतर दुकानामध्ये कोणीही ग्राहक नसल्याने, त्या इसमाचा टॉवेलने तोंड व नाक दाबून हाताने गळा आवळून जिवे ठार मारले व त्याचे गळ्यातील सोन्याची चैन काढून घेवून त्याचे प्रेत दुकानातच ठेवले. रात्रीच्या वेळी रस्त्यावर कोणीही येत-जात नसल्याची खात्री करुन प्रेत सलून जवळील बाजूच्या दुकानसमोरील गटाराचे झाकण उघडून त्यामध्ये प्रेत टाकून पुरावा नाहीसा केला असे त्याने सांगितले. मृतदेह गटारातून ताब्यात घेण्यात आला आहे. सलून चालक अशफाक इशाक शेख (39)याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक शितल मुंडे या करत आहेत.