

डोंबिवली : डाेंबिवली पूर्वेकडे सुनिलनगरमध्ये असलेल्या कवियत्री बहिणाबाई चौधरी उद्यानात सार्वजनिक वाचनालयावरून शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटांनी एकमेकांवर चिखलफेक केली आहे.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उद्यानातील मोकळ्या जागेत वाचनालय उभारण्याचा शिंदे गटाचा मानस आहे. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा निधी वापरला जाणार आहे. मात्र अबाल-वृद्धांसाठी उभारण्यात आलेल्या उद्यानाच्या हक्काच्या जागेत वाचनालय उभारले जाणार असल्याने त्याला ठाकरे गटाने कडाडून विरोध केला आहे. तर पोटदुखीच्या त्रासामुळे काही मोजके लोक लोकोपयोगी उपक्रमाला विरोध करत असल्याची टीका शिंदे गटाने केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील सुनिलनगरमध्ये कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने उद्यान उभारण्यात आले आहे. या उद्यानात सकाळ-संध्याकाळ अगदी रात्री उशिरापर्यंत लहान मुले, महिला, वयोवृद्ध नागरिक येतात. तर याच उद्यानात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून वाचनालय तयार होणार आहे. या कामाची पाहणी रविवारी काही अधिकाऱ्यांकडून करण्यात आली. हे काम शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून होणार आहे. तथापी समोरच्या इमारतीत २ हजार स्क्वेअर फूट जागेत अगदी वाचनालय वाचनालय आहे. ती जागा धूळखात पडून आहे. ते वाचनालय पुनर्जीवित करावे. पण जागा आक्रसळून उभारण्यात येणाऱ्या संभाव्य वाचनालयामुळे उद्यानात अडचण नको, असा आग्रह उद्यानात नियमितपणे येणाऱ्या नागरिकांनी धरला. नागरिकांच्या विरोधाला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली शहरप्रमुख अभिजीत सावंत या पार्श्वभूमीवर म्हणाले, हे उद्यान लहान मुलांसह वयोवृद्धांसाठी आहे. एखादे वाचनालय तयार झाले तर हे उद्यान लहान होईल. उद्यान असून नसल्या सारखी होईल. त्याचा काही फायदा होणार नाही. त्याठीकाणी तयार करण्यात येणारी वास्तू तोडण्यात येईल. स्थानिक नागरिकांच्या पाठीशी आम्ही ठाम आहोत. उद्यानातील वाचनालयाला आम्ही विरोध केला आहे. हे वाचनालय आम्ही होऊ देणार नसल्याची भूमिका नागरीकांनी देखील घेतली आहे.
या संदर्भात शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांनी सांगितले की, स्थानिक नागरीकांना विचारूनच वाचनमंदिर उभारण्याचा प्रस्ताव केला आहे. २५ लाखांच्या निधीतून सुसज्ज अशा उद्यानाची निर्मिती होणार आहे आहे. तेथे अत्याधुनिक सर्व सोयी आणि सुविधा असणार आहे. उद्यानाच्या बाहेर अनधिकृत बॅनरबाजी सुरु आहे. त्यावर कुणी का बोलत नाही ? एकीकडे होणारे वाचनालय अधिकृत असून ते होणारच, असा पावित्रा शिंदे गटाचे नितीन पाटील यांनी घेतला आहे. तर दुसरीकडे या मुद्यावर शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटांत चांगलीच जुंपल्याने राजकारण तापले आहे.