Thane News : ठाण्यात चक्क काँग्रेस कार्यालयाची चोरी?

आयुक्तांचे गुन्हा दाखल करण्याचे आदेश; दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी राहुल पिंगळे आक्रमक
Crime News
Crime Newspudhari photo
Published on: 
Updated on: 

ठाणे : ठाण्यामध्‍ये चक्क काँग्रेसच्या कार्यालयाचीच ओळख बदलण्याचा कथित प्रकार समोर आला आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे युवक काँग्रेस कार्यालयाचे नाव शिवसेना जनसंपर्क कार्यालय केल्याच्या आरोपावरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असले, तरी दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन आणि मूळ नोंद पूर्ववत करण्यासाठी राहुल पिंगळे यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

वागळे इस्टेटमधील किसन नगर क्रमांक ४, रोड नंबर २८ परिसरातील मालमत्ता क्रमांक ८०२२६३४ ही काँग्रेस पक्षाची अधिकृत मालमत्ता असून, महापालिका दप्तरी तिची नोंद 'युवक काँग्रेस कार्यालय' अशी आहे. या मालमत्तेचा नियमित करही काँग्रेसकडून भरला जातो. मात्र, अखिल भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांच्या नावाने कथित बनावट संमतीपत्र आणि खोट्या स्वाक्षरीचा वापर करून या कार्यालयाचे नाव बदलून 'सुरेश रमेश राम, शिवसेना जनसंपर्क कार्यालय, शांतिनगर' असे करण्यात आल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.

Crime News
Kalyan Metro Project : आठ वर्षांनंतर पुन्हा होणार कल्याण-मेट्रोचे भूमिपूजन

या प्रकरणी काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी पुराव्यांसह महापालिका प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती. मात्र, ५० दिवसांहून अधिक काळ उलटूनही कारवाई न झाल्याने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल कारभारी पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चीब यांचे अधिकृत मूळ पत्र आयुक्तांकडे सादर करण्यात आले. त्यानंतर आयुक्तांनी संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

यावेळी माजी नगरसेवक मोहन तिवारी, सन्नी थॉमस, ज्येष्ठ नेते सुरेश पाटीलखेडे, विधी विभागाचे अध्यक्ष दयानंद एगडे, काँग्रेस उपाध्यक्ष शिरीष घरत, महिला काँग्रेस अध्यक्ष स्मिता वैती, ब्लॉक अध्यक्ष संगीता कोटल, हर्षल कोळी, अजिंक्य भोईर, पप्पू आठवाल, स्वप्निल कोळी आदी उपस्थित होते.

Crime News
Western Railway Special Trains : पश्चिम रेल्वेवर धावणार सतरा नव्या मेल-एक्स्प्रेस

दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंद बदलण्यास जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका तपासून त्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि त्यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी राहुल पिंगळे यांनी केली. तसेच युवक काँग्रेस कार्यालयाची मूळ नोंद पूर्ववत करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.

याचिका दाखल करण्याचा इशारा

प्रशासनाने सात दिवसांत योग्य कारवाई न केल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्यासह उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा राहुल पिंगळे यांनी दिला आहे. काँग्रेसच्या मालमत्तेची नोंद बदलण्यामागील सूत्रधार कोण आणि या प्रकरणात महापालिकेतील अधिकाऱ्यांची भूमिका काय, याचा तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने लावून धरली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.