

बदलापूर (ठाणे) : बदलापूर शहरात मागील काही दिवसांपासून महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. शुक्रवारपासून (दि.4) रोती या त्रासाने अधिकच गंभीर रूप घेतले असून, ग्राहकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. या पार्श्वभूमीवर परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी थेट राज्याच्या ऊर्जा विभागाच्या अप्पर सचिव आभा शुक्ला यांच्याशी संपर्क साधत परिस्थितीची सविस्तर माहिती दिली.
महावितरणच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे. सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे केवळ घरगुती जीवनच नव्हे, तर शहराच्या पाणीपुरवठ्यावरही विपरीत परिणाम होत आहे. अनेक भागांत पाणीपुरवठा अनियमित झाल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत.
या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, कॅप्टन आशिष दामले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती समज देऊन समस्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. यासोबतच त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन उच्चस्तरीय बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत महावितरणच्या अधिकाऱ्यांना पाचारण करून बदलापूर शहरातील वीज समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असे दामले यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले.