Thane : शहापूरमध्ये लाखोंच्या नुकसानीला फक्त 4 हजारांची भरपाई

कशी शासनाने थट्टा आज मांडली! नुकसानग्रस्तांना तुटपुंजी रक्कमेचा परतावा
Shahapur
अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने घरावरील छतही उडून गेल्याने उघड्यावर आलेली कुटुंबेpudhari news network

किन्हवली : शहापूर तालुक्यात नोव्हेंबर 2023, फेब्रुवारी, एप्रिल, मे 2024 या कालावधीत झालेला अवकाळी पाऊस व वादळीवाऱ्याने नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. शासनाचे प्रतिनिधी या नात्याने तलाठ्यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून वस्तुस्थितीदर्शक पंचनामे करून शासनाला पंचनामे सादर करण्यात आले होते.

मात्र सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर एक ते दीड महिन्याने शासनाने नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यांवर तुटपुंजी रक्कम टाकून त्यांची चेष्टाच केली असल्याची संतप्त भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे दीड लाखांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या अवकाळीग्रस्तांच्या खात्यावर अवघी 4 हजार रुपये भरपाई टाकण्याचा प्रताप सरकारने केला असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नोव्हेंबर 2023 व 2024 च्या फेब्रुवारी, एप्रिल, मे महिन्यांत शहापूरच्या ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे कोठारे, पारधवाडी, बाबरेवाडी, रुमालपाडा, जुनवणी, पडवळपाडा, सारंगपुरी, चिल्हारवाडी, कृष्णाचीवाडी, खैरे, मुसईपाडा, मानेखिंड, शिरवंजे, आपटे, सोगाव, खरांगण, नांदगाव, सावरोली येथे घरे व इतर मालमत्तेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. मात्र जून महिना संपत आला तरी नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळाली नव्हती. याबाबतचे वृत्त दै. पुढारीने प्रसिद्ध करताच गुरुवारी (दि.२७) शहापूर तहसील कार्यालयाने नुकसानग्रस्तांच्या बँक खात्यावर मदतीची रक्कम टाकली आहे. मात्र ही रक्कम फारच तुटपुंजी असल्याने शासन नुकसानग्रस्तांच्या भावनांशी खेळत असल्याचा आरोप होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार तालुक्यातील जून व नोव्हेंबर 2023 च्या नुकसानभरपाईचे अनुदान अजूनही येणे बाकी असून एप्रिल 2024 मधील 553 नुकसानग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी 37 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 19 लाख 14 हजार 500 इतकी रक्कम सध्या उपलब्ध झाली असून 2 दिवसांपूर्वी 244 नुकसानग्रस्तांना प्राधान्यक्रमाने ऑनलाइन पद्धतीने बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. उर्वरीत 18 लाखांचे अनुदान आलेले नसून मे 2024 मधील 553 नुकसानग्रस्तांसाठी 69 लाखांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. परंतु ही मदत अद्यापही उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे काही नागरिकांना 4 हजार ते 7 हजारांपर्यंतची तुटपुंजी मदत मिळाली आहे.

अन्यथा आंदोलनाचा इशारा..

शिरवंजे येथील नुकसानग्रस्त नागरिक उत्तम बांगर यांचे 1 लाख 57 हजार रुपये नुकसान झालेले असताना त्यांना अवघी 4 हजारांची शासकीय मदत प्राप्त झाली आहे. मानेखिंड गावातील नुकसानग्रस्तांनाही 6 ते 7 हजारापर्यंतची शासकीय मदत मिळाली आहे. त्यामुळे शासनाने झालेले नुकसान लक्षात घेवून संबंधित नुकसानग्रस्तांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा नुकसानग्रस्तांनी दिला आहे.

माझ्या घराचे व मालमत्तेचे 1 लाख 52 हजारांचे नुकसान झाले आहे. मात्र शासकीय मदत फक्त 7 हजार रुपये मिळाली आहे. शासनाकडून उर्वरीत रक्कमेबाबत अजूनही मदतीची आशा आहे.

अनिल सपाट, मानेखिंड.

शासनाकडून उपलब्ध झालेले अनुदान प्राधान्यक्रमाने टप्पे टप्प्याने वाटप करण्यात येत असून उर्वरित अनुदान प्राप्त झाल्यावर शासकीय नियमानुसार सर्व नुकसानग्रस्तांना उर्वरीत सर्व रक्कम लवकरच वाटप करण्यात येईल.

वसंत चौधरी, नायब तहसिलदार(महसूल), शहापूर.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news