

ठाणे : रस्त्यावरील खड्डे, उघडी गटारे, तसेच रस्त्यांच्या देखभालीतील त्रुटीमुळे झालेल्या मृत्यू किंवा जखमी झालेल्या अपघातग्रस्तांना भरपाई निश्चित करुन ती वितरीत करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे निर्देश मा. उच्च न्यायालयाने 13 ऑक्टोबर 2025 रोजी दिले आहेत. या आदेशानुसार ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी महापालिका आयुक्त, ठाणे महानगरपालिका ठाणे यांची अध्यक्ष व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांची सदस्य म्हणून समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली.
महापालिका आयुक्त तथा चौकशी समितीचे अध्यक्ष सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे महापालिकेत झालेल्या बैठकीस जिल्हा विधी सेवा प्रधिकरणाचे सचिव व समितीचे सदस्य रविकांत पाझरकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे, एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता विनय सुर्वे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा,विधी सल्लागार मकरंद काळे, उपनगरअभियंता विकास ढोले, वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी, पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच विविध प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
ठाणे शहरात रस्त्यावरील खड्डे, उघडी मॅनहोल्स किंवा रस्त्याच्या देखभालीतील त्रुटीमुळे नागरिकाचा मृत्यू झाला असेल अथवा जखमी झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित नागरिकांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन आज झालेल्या बैठकीत करण्यात आले. या प्रकरणांमध्ये समिती कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने शहानिशा करुन जर अपघाताचे कारण रस्त्यावरील खड्डे किंवा उघडे मॅनहोल असल्यास तक्रारदार अपघातग्रस्ताला किंवा अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकाच्या नातेवाईकांना चौकशी करुन नियमांनुसार आवश्यक ती भरपाई महापालिकेमार्फत देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच अपघात घडल्यानंतर तक्रारदाराने 48 तासात समितीकडे तक्रार नोंदविणे आवश्यक आहे.
रस्त्यावरील खड्डयांमुळे झालेल्या अपघातांची समितीमार्फत शहानिशा करताना रस्त्याची मालकी कोणाची आहे, सदर रस्ता महापालिकेकडे हस्तांतरीत केला आहे का, तसेच अपघात ज्याठिकाणी घडला त्या संबंधित पोलीस ठाण्याने केलेला पंचनामा आदी सर्व बाबी विचारात घेतल्या जाणार आहेत.