

मिरा रोड : टेलिग्राम ग्रुपवरील शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक झालेल्या तक्रारदारांना २,५५,१०७ रुपये सायबर पोलिसांनी परत मिळवून दिले आहेत.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील तक्रारदार चौधरी यांनी शेअर ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळविण्याबाबत जाहिरात पाहिली. जाहिरातीमध्ये पाहिलेल्या ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तक्रारदार यांनी नफा मिळवण्याच्या उद्देशाने रक्कमेची गुंतवणूक केली; परंतु त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सायबर पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज सादर केला. याची नोंद घेऊन तक्रारदार यांची एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारदाराची फसवणुकीची रक्कम संशयित बँक खात्यात थांबवण्यात आली. ही रक्कम परत मिळवण्यासाठी न्यायालयात अर्जाबाबत सूचना दिल्या. तक्रारदारांनी रक्कम परतीसाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. सायबर पोलीस ठाणे यांनी तक्रारदारांची २,५५,१०७ रु. रक्कम त्यांच्या मूळ खात्यात परत मिळवून देण्यात आली आहे.