

ठाणे : ठाणे शहरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून, सामान्य ठाणेकर त्रस्त आहेत. या प्रश्नावर तीन ते चार दिवसांत महापालिका प्रशासनाने तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून महापालिका मुख्यालयासमोर कचरा टाकला जाईल, असा खणखणीत इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. ही कृत्रिम कचरा कोंडी मुंबई महापालिकेतून ब्लॅक लिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदारासाठी घडविली जात आहे का ? असा प्रश्न करीत मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणांहून वसूली करण्यासाठी ठाणे महापालिकेतील काही अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा लागली असल्याचा आरोप केला. या प्रकाराची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी `क्लिन टीएमसी' मोहीम हाती घ्यावी, असे आवाहन परांजपे यांनी केले.
ठाणे शहरात ठिकठिकाणी साचलेल्या कचऱ्यामुळे ठाणेकरांची होणारी गैरसोय आणि मुंब्रा येथील अनधिकृत बांधकामांच्या ठिकाणावरून केल्या जाणाऱ्या खंडणी वसूलीच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी पालिका अधिकाऱ्यांवर तोफ डागली. ते पुढे म्हणाले ठाणे शहरात कचऱ्याच्या डंपिंगचा प्रश्न सोडविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. या प्रकाराला प्रशासन जबाबदार आहे. तसेच वर्षानुवर्षे सत्ता राबविणाऱ्या पक्षाची कचऱ्यावर तोडगा काढण्याची नैतिक जबाबदारीही होती, असे नमूद करीत आनंद परांजपे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील १४०० कोटी रुपयांच्या कामामधून ब्लॅक लिस्ट केलेल्या एका विशिष्ट ठेकेदाराला ठाण्यातील ठेका मिळावा, यासाठी हा खेळ खेळला जात आहे का, असा सवाल केला. ठाण्यातील निविदा प्रक्रियेची मुदत पूर्ण झाली असूनही निविदा उघडली गेलेले नाही, असा आरोप परांजपे यांनी केला. या प्रकारातून ठाणेकरांच्या जीवाशी खेळले जात आहे, अशी टीका परांजपे यांनी केली. या कचरा कोंडीला राष्ट्रावादी काँग्रेसने सत्ताधारी शिवसेनेला जबाबदार धरल्याने आगामी काळात महायुतीमधील वाद अधिकच पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवरील व्हायरल व्हिडिओतून काही खंडणीखोरांना पळवून लावल्याचे दिसले होते. गेल्या दोन-तीन वर्षांपासून मुंब्र्यात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असून, मुंब्र्यात सहायक आयुक्त म्हणून कोण जाणार, याबाबत स्पर्धा सुरू झाली आहे. २५ लाख रुपयांत सहायक आयुक्त व्हा, असा अधिकाऱ्यांच्या ग्रुपवरील मॅसेज व्हायरलही झाला होता. महापालिकेचा एक अधिकारी २८ फेब्रुवारी रोजी निवृत्त झाल्यानंतर, त्याच्या जागी वसूली करण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. अनधिकृत बांधकामे सुरू असलेल्या खान कंपाऊड, सहारा सिटी यासारख्या भागात आयुक्त सौरभ राव यांनी जाऊन पाहणी करावी, असे आवाहन आनंद परांजपे यांनी केले.
गेल्या वर्षी विधानसभेच्या अधिवेशनात मुंब्रा येथील जसबीर उर्फ बिलाल शेख हा महापालिकेच्या अधिकाऱ्यासाठी खंडणी वसूली करीत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. मात्र, आता त्याला पुन्हा पक्षात घेतले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी फेसबूक लाईव्ह जितेंद्र आव्हाड करणार का, असा सवाल परांजपे यांनी केला. या प्रकरणाची पोलिस आयुक्तांनी दखल घ्यावी, असे आवाहनही परांजपे यांनी केले.
ठाणे महापालिकेतील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे त्याच पदावर कार्यरत आहेत. या प्रकाराची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करून `क्लिन टीएमसी' अभियान राबवून ठाणेकरांना चांगले प्रशासन द्यावे, अशी मागणी आनंद परांजपे यांनी केली. या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस नजीब मुल्ला व इतर पदाधिकाऱ्यांसह भेट घेऊन माहिती दिली जाईल. तसेच कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल, असे परांजपे यांनी सांगितले.