डोंबिवली : बदलापूरातील शाळेत शिकणाऱ्या चिमुरडींवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील टिटवाळ्याजवळच्या एका गावात घरासमोर खेळणाऱ्या दोन वर्षीय चिमुरडीवर ३५ वर्षीय नराधमाने अमानुषपणे लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर या परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. मांडा-टिटवाळ्यातील संतप्त नागरिकांनी रविवारी (दि.१) तालुका पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला.
टिटवाळ्यातील तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या दोन वर्षीय चिमुरडीवर शुक्रवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास त्याच परिसरात राहणाऱ्या ३५ वर्षीय नराधमाने निर्जनस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार केला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत रविवारी (दि.१) सकाळी पोलिस ठाण्यावर निषेध मोर्चा काढला. या मोर्चात सामाजिक संस्थांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह परिसरातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या घटनेतील नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मोर्चेकऱ्यांनी मागणी केली. यावेळी मोर्चेकऱ्यांकडून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्थेचा गालबोट लागू नये, याकरिता मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.