

ठाणे : ठाणे शहराच्या अंतर्गत भागातून मेट्रो धावणार असून सर्व स्थानकांची यादी समोर आहे. नवी दिल्लीसारखं महाराष्ट्रात पहिल्यांदाच शहराच्या अंतर्गत भागात मेट्रो धावणार आहे. ठाणे शहराच्या अंतर्गत भागातून धावणाऱ्या रिंग मेट्रोच्या कामाला अधिकृतपणे सुरुवात झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून संयुक्त अर्थसहाय्य मिळालेल्या या ठाणे इंटर्नल रिंग मेट्रोमुळे ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मेट्रो मार्गिकेसाठी पहिल्या टप्प्यातील बांधकामाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील वाढत्या वाहतूककोंडीच्या समस्येवर मात करता येणार आहे. ठाणे अंतर्गत रिंग मेट्रोचा पहिला भाग ठाणे शहरातील सर्वाधिक वाहतूककोंडी होत असलेल्या घोडबंदर मार्गाजवळ तयार करण्यात येणार आहे. शहरात घोडबंदर, जुने ठाणे आणि वागळे इस्टेट परिसरात वेगाने शहरीकरण झाले आहे. यामुळे शहरातील रस्त्यांवरील भार वाढला असून दररोज ठाणेकरांना वाहतूककोंडीतून प्रवास करावा लागतो. दररोज तासन्तास वेळ फक्त प्रवासातच निघून जातो.
या मार्गावरील काही रस्ते अरुंद असल्यामुळे तीव्र वाहतूक कोंडी होते. त्यामुळे या मेट्रोची या परिसरांमध्ये सर्वाधिक गरज आहे. या परिसरांमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. हे कर्मचारी दररोज ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाताना खासगी वाहने किंवा रिक्षाने प्रवास करतात. बससेवा उपलब्ध असूनही प्रवाशांची संख्या मोठी असल्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी पडते. त्यामुळे या वाढत्या खासगी वाहनांने शहरातील कोंडी आणि गर्दी वाढते.
या सर्व समस्यांवर उपाय म्हणून, महा मेट्रोने शहरातील अंतर्गत भागात 29 किमी लांब मेट्रो कॉरिडोर उभारण्याचा निर्णय घेतला. या प्रकल्पासाठी एकूण 12,000 कोटींचा खर्च अपेक्षित असून वर्तुळाकार मार्गावर मेट्रो धावणार आहे. पश्चिम ठाण्यातील परिसर ओलांडून एक वर्तुळाकार मार्ग उभारण्यात येणार आहे.
मेट्रो, बस, रेल्वेला जोडणी
यापैकी रायला देवी मेट्रो स्थानकातून मुंबई मेट्रो लाइन 4 साठी इंटरचेंज तयार करणार. तसेच, डोंगरीपाडा येथेही हे इंटरचेंज उपलब्ध असेल. दरम्यान, बाळकुम नाक्यावरून मेट्रो लाइन 5 ला जोडणी मिळणार असून ठाणे जंक्शन ठाणे रेल्वे स्थानक आणि सिडको बस स्थानकाजवळ असेल. यामुळे ठाण्यातील नागरिकांना मेट्रो, रेल्वे आणि बससारख्या सार्वजनिक सेवांचा लाभ घेता येणार असून कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
कशी असतील स्थानके?
ठाणे रिंग मेट्रोच्या मार्गावर एकूण 22 स्थानके असतील. ही स्थानके शहरातील महत्त्वाच्या रहिवासी आणि व्यावसायिक केंद्रांजवळ उभारले जातील.
मुख्य थांबे : रायला देवी, वागळे चौक, लोकमान्य नगर बस डेपो, छत्रपती शिवाजी महाराज नगर, नीळकंठ टर्मिनल आणि गांधीनगर.
निवासी दुवे : डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजय नगरी, वाघबीळ आणि पाटलीपाडा
महत्त्वाचे इंटरचेंजेस : आझादनगर बस डेपो, मनोरमानगर, कोलशेत, बाळकुम नाका, राबोडी, ठाणे जंक्शन आणि न्यू ठाणे.
एप्रिलमध्ये घोडबंदरजवळ बांधकाम सुरू करण्यात आले आहे. सध्या मेट्रोसाठी पाया रचण्याचे काम सुरू असून 2029पर्यंत ही मेट्रो प्रवाशांसाठी खुली करण्याचे महामेट्रोचे उद्दिष्ट आहे.
सानिया कदम