भिवंडी: शहराची तहान भागविणारा वर्हाळा तलाव मृत्यूचा सापळा बनत असल्याची चर्चा सुरू असतानाच या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने शांतीनगर परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
गुलाम मुस्तफा अन्सारी (13),शेख साहील पीर मोहमद (10) आणि दीलबर रजा शमशुल्ला (12 तिघेही रा.शांतीनगर, पिराणी पाडा) अशी बुडून मयत पावलेल्या शाळकरी मुलांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार,मयत तिघेही शांतीनगर पोलिस ठाणे हद्दीतील पिरानी पाडा परिसरातील वेगवेगळ्या कुटुंबात रहमत मदिना मस्जिदीजवळ राहत असून तिघेही मित्र आहेत.दरम्यान बुधवारी (दि.20) रोजी दुपारी 1 ते दीड वाजताच्या सुमारास हे तिघेही घराबाहेर खेळण्यासाठी निघाले होते. मात्र बराच वेळ होऊनही तिघेही घरी न परतल्याने तिघांच्याही कुटुंबीयांनी शांतीनगर पोलिस ठाणे गाठून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देताच पोलिसांनी तिघांना कोणीतरी अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याबाबत गुन्हा नोंदवला होता.तर पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून या तिघांचा शोध सुरू केला असता मयतापैकी गुलाम याचा मृतदेह गुरुवारी सायंकाळी स्थानिकांना वर्हाळा तलावात दिसून आला.त्यानंतर भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिस प्रशासनाने अन्य दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता त्यांचाही मृतदेह रात्री उशिराने सापडून आला आहे.तर हे तिघेही पोहण्यासाठी वर्हाळा तलावात गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.दरम्यान त्यांना तलावातील खोलीचा अंदाज न आल्याने तिघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचेही सांगण्यात येत आहे.तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तीनही मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून येथील शासकीय स्व.इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठवले आहेत.याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास शहर पोलिस करीत आहेत.