ठाणे : दुरुस्त करण्यासारख्या इमारती ठरवल्या जात आहेत धोकादायक ?

बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी महापालिकेची धोकादायक इमारतींची मोहीम?
Thane Mahanagarpalika
धोकादायक इमारती खाली करण्याची मोहीम ठाणे महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.file photo

ठाणे : पावसाळा जवळ आला की धोकादायक इमारती खाली करण्याची मोहीम ठाणे महापालिकेकडून सुरू करण्यात येत असते. मात्र यातील बहुतांश इमारती या दुरुस्त करण्यासारख्या असतानाही ठाणे महापालिकेकडून या इमारती धोकादायक श्रेणीत टाकण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष करून जुन्या ठाण्यात हे प्रकार सर्रास होत असून स्ट्रक्चरल ऑडिट न करताच इमारती खाली करण्याचे फर्मान ठाणे महापालिकेकडून सोडण्यात येत असून हे सर्व प्रकार बिल्डर लॉबीसाठी सुरू आहेत की काय, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

जुने ठाणे असलेल्या नौपाडा विभागात अनेक जुन्या अधिकृत इमारती आहेत. तर काही भागात अजूनही चाळींमध्ये नागरिक वास्तव्य करीत आहेत. या भागातील जागांचे भाव गगनाला भिडल्यामुळे काही बिल्डरांनी महापालिकेच्या नौपाडा विभागातील काही अधिकाऱ्यांबरोबर हातमिळवणी केली. त्यातून काही चाळी व मोक्याच्या ठिकाणांवरील जुन्या अधिकृत इमारतींवर बिल्डरांची नजर गेली. त्यातून चाळ मालकांबरोबर संधान साधून सुस्थितीतील व दुरुस्तीयोग्य असलेल्या चाळी व इमारतींना धोकादायक म्हणून जाहीर केले जात आहे. तसेच चाळीतील रहिवाशांवर दहशत पसरवली जात आहे. या प्रकारामुळे सामान्य रहिवाशी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी संजय वाघुले यांनी केली आहे. महापालिकेच्या नियमानुसार धोकादायक चाळी व इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करणे गरजेचे असते. मात्र, जागा बळकावण्याचा हव्यास असलेल्या बिल्डरांनी नियमांची पायमल्ली सुरू केली. त्यातून दादा पाटीलवाडीतील १२ फूट उंच असलेली १० बाय २० चौरस फूटांचे रूम असलेली १० भाडोत्री राहणारी चाळ धोकादायक ठरवून पाडण्याचा घाट घातला गेला आहे. ही चाळ पाडण्यात बिल्डरांना यश आल्यास नौपाड्यातील आणखी काही चाळी व जुन्या इमारतींवरही कुन्हाड चालविली जाईल, अशी भीती वाघुले यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर सध्या नौपाड्यातील जुन्या इमारतींमधून 'हक्क प्रमाणपत्र' देतानाही हेतूपुरस्सरपणे दिरंगाई केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पक्की चाळ धोकादायक जाहीर केली...

महापालिकेच्या नौपाडा विभागातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बिल्डरांबरोबर हातमिळवणी करून दादा पाटीलवाडीत असलेली सुस्थितीतील एक पक्की चाळ धोकादायक जाहीर केली आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून चाळीतील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. याच पद्धतीने नौपाड्यातील पक्क्या चाळी व अधिकृत सुस्थितीतील इमारती धोकादायक जाहीर करण्याचा उद्योग सुरू झाला आहे, याकडे वाघुले यांनी पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news