

डोंबिवली : बांधकाम व्यवसायिकांच्या मुलाला रिक्षाने शाळेत घेऊन जात असताना त्याचे अज्ञाताने अपहरण केले. २ कोटीच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आले होते. मानपाडा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने तपासचक्रांना वेग देऊन अवघ्या साडेतीन तासांत चार आरोपींसह अपहृत मुलाची सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे तपासात उघड झाले आहे. वीरेन पाटील (२५) या रिक्षा चालकासह आणि त्याचा एक साथीदार व अन्य दोन अल्पवयीन आरोपींना मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या रिजन्सी अनंतम् येथे राहणाऱ्या कोमल भोईर यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि.२८) सकाळी धाव घेऊन मुलगा बेपत्ता झाल्याची पोलिसांसमोर कैफियत मांडली. सकाळी शाळेत निघालेल्या मुलाचे ७.३० ते ९.०७ च्या दरम्यान रिक्षा क्रं. (एमएच ०७ डीक्यू ९८८८) रिक्षातून खंडणीसाठी अपहरण झाल्याची तक्रार कोमल यांनी पोलिस ठाण्यात ९.३० वाजता नोंदविली. खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या अपहरणकर्त्यांनी २ कोटी रूपये न दिल्यास तसेच पोलिसांना कळविल्यास मुलाला जीवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली होती. त्यानंतर मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्याण परिमंडळ ३ पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादंबाने, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक रामचंद्र चोपडे सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत फडोळ, महेश राळेभात, कलगोंडा पाटील, हेमंत ढोले, सागर चव्हाण, अभिजीत पाटील, स्वाती जगताप या अधिकाऱ्यांसह सुनील पवार, राजेंद्र खिलारे, बाबा जाधव, संजू मसाळ, शिरीष पाटील, विकास माळी, सचिन साळवी, सुशांत पाटील, आदींची ५ पथके वेगवेगळ्या दिशांना रवाना करण्यात आली.
कोमल भोईर यांच्या मुलाला शाळेत ने-आण करणारा रिक्षाचालक विरेन पाटील याचा पोलीसांना संशय आला. त्या दिशेने पोलिसांनी विरेन विषयी तांत्रीक माहिती प्राप्त केली. त्यानंतर मिळालेल्या माहितीचे तांत्रीक विश्लेषण करून विरेन पाटील आणि रिक्षाचा माग पोलिसांनी शोधून काढला. त्यानंतर अवघ्या साडेतीन तासांत अपहृत मुलाची शहापूर येथून पोलिसांनी सुखरूप सुटका केली. सकाळी या मुलाला शाळेत घेऊन जाण्याऐवजी वीरेन पाटील याने रिक्षा डोंबिवलीहून शहापूरकडे नेली. मुलाच्या आई-वडील सधन आहेत. वडील बांधकाम व्यवसायिक आहेत. मुलाच्या सुटकेसाठी दोन कोटी रूपये ते सहज देतील, असा अपहरणकर्त्यांचा अंदाज होता. त्यासाठी प्रवासादरम्यान अपहरणकर्त्यांनी अपहृत मुलाच्या पालकांना २ कोटींच्या खंडणीसाठी धमकावले. मुलाच्या जीवाला धोका होता. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत सावधगिरीने हाताळण्याचा निर्णय घेतला होता. अखेर पोलिसांच्या तपासाला अवघ्या साडेतीन तासांत यश आले. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवून आणलेल्या अपहृत मुलाला त्याच्या आई-वडीलांच्या ताब्यात देण्यात आले.